स्वच्छ भारत अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्हा भारतात दुसरा..
१ हजार ४५५ गावे ओडीएफ प्लस करण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला यश..

रत्नागिरी (प्रतिनिधी) स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारी मुक्त गावांमध्ये एप्रिल, मे या सलग महिन्यात रत्नागिरी जिल्ह्याने भारतात दुसर्या क्रमांकावर भरारी घेतली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार ४५५ गावे हागणदारी मुक्त करण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला यश आले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त करण्याची मोहीम केंद्र सरकारने राबवली होती. यामध्ये सामूहिक वस्तीच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी, दैनंदिन साफसफाई, उघड्यावर मलमूत्र विसर्जन करणार्यांना प्रतिबंध करणे, कँटोन्मेंट हद्दीतून वाहणार्या नाल्यांच्या बाजूचे सुशोभीकरण व उद्यानांची उभारणी असे विविध उपक्रम राबवले होते. त्यानंतर केंद्र शासनाने ओडीएफ प्लस गावे करण्याची मोहीम हाती घेतली. यामध्ये सामुदायिक शौचालय, प्राथमिक विद्यालय, सामुदायिक घरे, अंगणवाडी या ठिकाणीही शौचालयांची व्यवस्था, प्लास्टिकच्या वापरावर बंधने, प्लास्टिक कचरा संकलनाचे नियोजन, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन यावर भर दिला आहे. हे उपक्रम प्रत्येक ग्रामपंचायतीत राबवले आहेत का, हे पाहण्यासाठी केंद्राकडून संस्थेची नेमणूक केली आहे.
ओडीएफ प्लसमध्ये रत्नागिरी जिल्ह्याने महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये चांगली कामगिरी केली आहे.