रविकांत तुपकरांची मोठी घोषणा; विधानसभेत लढणार 6 जागा

मुंबई – शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शनिवारी (ता. 6 जुलै) आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र लढणार असल्याची मोठी घोषणा केली. याआधी त्यांनी राजकीय भवितव्य ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. याच बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील 6 विधानसभेच्या जागांवर उमेदवार देणार असल्याची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून लढताना त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले होते. पण यावेळी त्यांचा पराभव जरी झाला असला तरीही त्यांना अडीच लाख मते मिळाली होती. यावरून ते म्हणाले की, “जरी लोकसभा निवडणूक आपण हरलो असलो, तरी जनतेच्या मनात आपण जिंकलो आहोत. प्रतापराव जाधव हे कागदावर जरी जिंकले असले तरी ते जनतेच्या मनातून हरले आहेत. जनतेचा कौल आपल्या सोबत असल्याने आता आपल्याला पराभवाला खचून न जाता बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढायची आहे.” असे म्हणत कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “मला उठसुठ नोटीस पाठवतात आणि पुण्याला हजर व्हा सांगतात. मी काय दरोडा टाकला आहे का?” असा सवाल त्यांनी केला. “मी या लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष असूनही पक्षाविषयी जास्त मत घेतली. त्यामुळे माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी विचार करावा. इमानदारीने वागत असल्याने गेल्या 22 वर्षांपासून माझ्यासोबत लोकं टिकून आहेत,” असे म्हणत रविकांत तुपकर यांनी टोला लगावला. “मी जर लोकसभा निवडणूक लढवली नसती, तर निवडणूक हिंदू मुस्लिम झाली असती. माझ्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न निवडणुकीत आले. आता अर्थसंकल्पामध्येही आले. त्यामुळे चुका दुरुस्त करून आपल्याला पुढे जायचे आहे,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. “13, 14 जुलैला पुण्यामध्ये कार्यकारणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये राज्यातील कोणकोणत्या भागात निवडणुका लढवायच्या याबाबत निर्णय घेणार आहोत,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.