मुंबई

शिरीष कणेकर यांच्या ५५व्या पुस्तकाचे प्रकाशन

खरंतर आपण कणेकरांना बँक यू म्हटले पाहिजे - खा. संजय राऊत

 

मुंबई – कणेकर म्हणजे वाचनीय मजकुराचा परवलीचा शब्द। सिनेमा असो, क्रिकेट असो… त्यांच्या लेखनाचा कधी कंटाळा आला नाही. त्यांच्या शैलीने आपल्याला कायम आनंद दिला. आज आपण त्यांचे ‘थैंक यू’ पुस्तक प्रकाशित केले. खरंतर आपण कणेकरांना बँक यू म्हटले पाहिजे एवढा आनंद त्यांनी आपल्याला दिलाय, असे प्रतिपादन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. निमित्त होते कणेकर यांच्या ५५ व्या पुस्तकाचे !

लेखन हा ज्यांचा श्वास राहिला असे लेखक शिरीष कणेकर यांच्या स्मृतिदिनी त्यांचे ‘थैंक यू’ पुस्तक संजय राऊत यांच्या हस्ते आज प्रसिद्ध झाले. कणेकरांनी दैनिक ‘सामना’मध्ये लिहिलेल्या लेखांचे हे पुस्तक आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर, कणेकरांच्या पत्नी भारती कणेकर, मुलगी श्वेता कणेकर-सुळे आणि नवचैतन्य प्रकाशनचे शरद मराठे उपस्थित होते. यानिमित्त कणेकरांच्या खुमासदार खुसखुशीत आठवणी तसेच ‘फिल्लमबाजी’ आणि ‘फटकेबाजी’ मध्ये चाहते चिंब भिजून गेले. कणेकरांच्या आठवणी जागवताना संजय राऊत म्हणाले, कणेकर यांचे सामना परिवार, शिवसेना परिवार आणि ठाकरे परिवाराशी जिव्हाळ्याचे नाते होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांची सतत आठवण काढायचे. पु.ल. देशपांडे यांच्यानंतर सर्वात जास्त वाचले गेलेले आणि सर्वात जास्त स्वीकारले गेलेले लेखक म्हणजे कणेकर… त्यांच्या लेखनाचा ‘कनेक्ट’ जुन्या पिढीबरोबर नव्या पिढीशी होता. दैनिक ‘सामना’शी त्यांचे नाते विशेष होते. शेवटपर्यंत मी लिहीत राहीन असे ते म्हणायचे. त्यांचे निधन झाले तेव्हा ‘सामना’मध्ये त्यांचे तीन लेख शिल्लक होते… शिवाजी पार्कवर जसा त्यांचा कणेकर कट्टा रंगायचा तशीच कट्टा मैफल ते ‘सामना’च्या ऑफिसमध्ये आल्यावर रंगवायचे. ते जिथे असतील तिथे स्टॅण्ड अप कॉमेडी शो सुरू व्हायचा. असा भरभरून आनंद त्यांनी आपल्याला दिला. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी कणेकरांचे अनेक मजेशीर किस्से सांगितले. सूत्रसंचालन शोभा नाखरे यांनी केले.

लिखाण हा कणेकर यांचा श्वास होता, आनंद होता. हा आनंद आज आपण त्यांना देतोय. त्यांच्या स्मृतिदिनी पुस्तक प्रकाशित होतेय, हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे, अशा भावना कणेकरांची मुलगी श्वेता कणेकर-सुळे यांनी व्यक्त केल्या. शिरीष कणेकर यांच्या नावाने ललित, सिनेमा वा क्रिकेटवरील पुस्तकाला पुरस्कार देण्याची घोषणा त्यांनी कुटुंबीयांच्या वतीने केली. मुंबई मराठी पत्रकार संघामार्फत हा पुरस्कार दिला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!