कोंकण

बाव ग्रामस्थांचे सा.बा. ऑफिस समोर ठिय्या आंदोलन

सिंधुदुर्ग – कुडाळ ते बाव, कविलकाटे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांचे हाल होत आहेत. अनेक दिवस मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज ग्रामस्थांनी कुडाळच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयांवर धडक देत ठिय्या आंदोलन केले.

ग्रामस्थांच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्य्क कार्यकारी अभियंता धीरजकुमार पिसाळ यांनी दोन दिवसात खड्डे बुजवून देतो, असे लेखी आश्वासन दिल्यावर. ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. आज सकाळी साडेदहा वाजल्यापासचं बाव गावचे ग्रामस्थ रस्त्याच्या दुरवस्थेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुडाळ कार्यालयात जमा झाले होते. पण अधिकारीच नसल्याने ते त्यांची प्रतीक्षा करीत थांबले होते. ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु झाले. यापूर्वी देखील या ग्रामस्थांनी याच विषयावरून अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी कोणीच अधिकारी त्यांना भेटले नव्हते. त्यामुळे हे सर्व ग्रामस्थ आज पुन्हा रस्ता प्रश्नी एकत्र आले होते.

दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला सहाय्य्क कार्यकारी अभियंता धीरजकुमार पिसाळ कार्यालयात आले. पण त्याच्या केबिन मध्ये जाऊन चर्चा करायला ग्रामस्थांनी नकार दिला आणि केबिनच्या बाहेरच ग्रामस्थ ठाण मांडून बसले. काही वेळाने सहाय्यक कार्यकारी अभियंता पिसाळ हे देखील ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांच्या सोबत जमिनीवरच बसले. त्यावेळी ग्रामस्थांनी रस्ता दुरवस्थेबाबत अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला प्रश्न विचारून धारेवर धरले. ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचे निवेदन श्री. पिसाळ याना दिले. आणि जोपर्यंत याबाबत लेखी म्हणणे सा.बा. विभाग देत नाही तोपर्यंत उठणार नाही असे सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी पत्र येईपर्यंत ग्रामस्थ ठाण मांडून होते. काही वेळाने पिसाळ यांनी ग्रामस्थांना हवे असलेले पत्र दिले. उद्या ३० ऑगस्ट पासून या मार्गावरील खड्डे कॉंक्रिटने भरण्यात येतील आणि ते काम दोन दिवसात ठेकेदाराकडून पूर्ण करण्यात येईल. त्याच बरोबर रस्त्याच्या बाजूची झाडी मारण्याचे काम देखील करण्यात येईल, असे पत्र सा.बा. विभागाकडून मिळाल्यावर ग्रामस्थांनी तीन तास सुरु असलेले आंदोलन मागे घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!