मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती बेमुदत उपोषण करणार

मुंबई- मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या प्रलंबित अन्य मागण्यांसाठी राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे.आज मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती दिली आहे.२६ फेब्रुवारीपासून आपण बेमुदत उपोषण करणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी माध्यमांशी बोलताना,’आम्ही आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात किंवा कोणताही राजकीय अजेंडा घेऊन आलेलो नाही. मराठा समाजाला न्याय मिळावा, एवढीच आमची मागणी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वंशज म्हणून मी मराठा समाजावर अन्याय होतो, या कारणाने २००७ पासून महाराष्ट्र पिंजून काढतोय. ज्या शिवाजी महाराजांनी १८ पगड जातीचं नेतृत्व केलं, ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला पहिलं आरक्षण दिलं, त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीसह मराठा समाजाचा समावेश होता. त्याच समाजासाठी आज माझा लढा आहे,’ असं ते म्हणाले.
याचसोबत संभाजीराजे म्हणाले की, ‘मराठा समाज देखील वंचित घटक आहे. त्यासाठीच मी आरक्षणाची भूमिका घेतली. इतक्या वेळा आंदोलन करूनही माझी कोणतीच मागणी पूर्ण झालेली नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो, पण आता मी उद्विग्न झालो आहे. मला टोकाची भूमिका न घेण्यास सांगण्यात आलं. पण सरकार काहीच हालचाल करत नाही. त्यामुळे २६ फेब्रुवारीला मी स्वतः बेमुदत उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार आहे,’ असं त्यांनी सांगितलं.