इडीची छापेमारी,किरीट सोमय्यांचा समाचार,मुनगंटीवारांवर निशाणा आणि शिवसेनेचा बाणेदारपणा,वाचा संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतली चौफेर टोलेबाजी

मुंबई:- शिवसेनेने दिलेल्या पत्रकार परिषदेच्या इशाऱ्यानंतर खासदार संजय राऊत यांची तुफानी पत्रकार परिषद आज शिवसेना भवन येथे पार पडली आहे.यातून संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांसह भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीकास्त्र डागलं.
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेची सुरुवात करताना, ‘सर्व नेते आजची ही पत्रकार परिषद बघत आहेत. मला शरद पवारांचाही फोन आला. महाविकास आघाडीतले प्रत्येक प्रमुख नेता आमच्या सोबत आहेत. ही पत्रकार परिषद हे सांगण्यासाठी आहे की कितीही नामर्दानगी करून तुम्ही पाठीवर वार केलेत तरी शिवसेना घाबरणार नाही’,असा सूचक इशारा भाजपला आणि केंद्रीय तपास यंत्रणांना दिला.
यानंतर त्यांनी आपला मोर्चा भाजप नेते किरीट सोमय्यांकडे वळवला.सोमय्यांचा उल्लेख दलाल म्हणून करत संजय राऊतांनी,’ठाकरे परिवाराच्या नावावर १९ बंगले आहेत, असा दावा त्या दलालाने केला आहे, मुलुंडच्या दलालाने. माझं त्याला आव्हान आहे,पत्रकारांनो आपण सगळे मिळून बस करून त्या १९ बंगल्यांवर पिकनिकला जाऊ. मी देतो चाव्या. ठाकरेंच्या मालकीचे बंगले आढळले तर मी राजकारण सोडेन’,असं वक्तव्य केलं.
यानंतर किरीट सोमय्या यांच्या विषयी बोलताना,’किरीट सोमय्या हे इडी कार्यालयात जाऊन खिचडी खातात. पीएमसी बँक घोटाळ्याचा सोमय्यांकडून पुन्हा पुन्हा उल्लेख केला जातोय. त्यातला मुख्य आरोपी राकेश वाधवानशी आमचे संबंध असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. मात्र,याच राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या खात्यात पक्ष निधीच्या नावावर वीस कोटी गेले. मला सांगा निकॉन इन्फ्रा कंपनी कोणाची आहे? ती किरीट सोमय्यांची आहे. किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागिदार आहेत. किरीट सोमय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन घेतली. वसईत लाडानीच्या नावावर ही चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटीला घेतली,असा सणसणीत आरोप संजय राऊत यांनी केला.
यानंतर संजय राऊतांनी माजी वनमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या सुधीर मनगुंटीवारांवरही मुलाच्या लग्नात साडे नऊ कोटीचे रेड कार्पेट टाकल्याचा आरोप केला.इडीवर बोलताना,’इडी वाल्यांनी माझ्या घरी यावं,त्यांच्या विरोधात आता मी लढणार, जितेंद्र नवलानी कोण आहे? हे नाव ऐकल्यावर मुंबई आणि दिल्लीतील इडीच्या लोकांचा घसा सुकेल.गेले ४ महिने इडीच्या नावावर वसुली सुरू आहे. ७० बिल्डरकडून सुरू आहे, हे इडीच्या काही अधिकाऱ्यांना माहीत आहे. मी याबाबत मोदी, अमित शाह यांना पत्र लिहिणार आहे. अशा ४ एजंटनी ३०० कोटी रुपये वसूल केले आहेत’,असे संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
याचसोबत खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी भाजपचे साडे तीन नेते जेलमध्ये जाणार असल्याचं वक्तव्य केलं होतं.यावर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना,’कितीही धमकावा महाराष्ट्रात ठाकरे सरकार राहणार. हा फक्त ट्रेलर आहे. येणाऱ्या काळात आणखी कागदपत्रं, आणखी व्हिडिओ समोर येणार.उद्यापासून महाराष्ट्रातील जनतेला सर्व कळेल. जसजसे आत घुसू तसतसे भाजपला कळत जाईल’, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान आता संजय राऊतांच्या या पत्रकार परिषदेवर भाजप नेते काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.