बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जी मर्दानगी शिकवली, ती उद्या दिसेल,शिवसेना खासदार संजय राऊत यांचं सुचक वक्तव्य

मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.राऊत उद्या शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज शिवसेना भवन परिसरात पाहणी केली. तसंच शिवसेनेच्या सर्व नेत्यांना महत्वाच्या सूचनाही दिल्या.
यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आहे आणि उद्या महाराष्ट्र बोलणार आहे, अशा शब्दात राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोपांची मालिका सुरु केलीय. या आरोपांनंतर संजय राऊतांनी आक्रमक होत पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांची आणि केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल करणार असल्याचा इशारा दिलाय.
उद्याच्या पत्रकार परिषदेकडे त्यांचं लक्ष असायलाच पाहिजे. त्यांनी माझी उद्याची पत्रकार परिषद काळजीपूर्वक ऐकायला हवी. केंद्रीय तपास यंत्रणांच्या प्रमुखांनी तर आवर्जुन ऐकायला हवी. उद्या शिवसेना हा पक्ष नाही तर महाराष्ट्र, मराठी माणूस बोलणार आहे.
मला वाटतं उद्या त्यांना कळेल महाराष्ट्र काय आहे ते. केंद्रीय तपास यंत्रणांचे जे धंदे सुरु आहेत ना ते बंद होणार उद्यापासून. शिवसेना हाच महाराष्ट्र आहे. कुणीही येतो आणि महाराष्ट्राची बदनामी करतो. महाराष्ट्र उसळेल, अन्यायाविरुद्ध लढेल, नुसता लढणार नाही, तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश आहोत हे दाखवून देऊ. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जी मर्दानगी शिकवली, ती उद्या दिसेल, अशा शब्दात राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांना इशारा दिलाय.