महाराष्ट्रमुंबई

शेतकऱ्यांना सावरू; मदतीसाठी लवकरच योजना !

आपत्तीग्रस्तांना सरकारची सढळ मदत, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

उद्योजक, संस्थांनी सीएसआर फंड द्यावा

मुंबई : पुराने अस्मानी संकटात सोडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, कष्टाने उभारलेले संसार पुन्हा सावरण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागातील दौऱ्यावरून परतल्यानंतर योजना नक्की केली जाईल. त्यानुसार शेतकऱ्यांना अधिकाधिक मदतीचा निर्णय घेऊ, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मुंबईत पत्रकारांना बावनकुळे यांनी सांगितले की, राज्याचा जवळपास अर्धा भाग पूरग्रस्त झाला असून, पूरग्रस्त कुटुंब व शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी सरकार तत्पर आहे. ती सुरूही झाली आहे. संपूर्ण मंत्रिमंडळ पूरग्रस्त भागातील पाहणीसाठी गेले आहे. मदतीसाठी सगळेच तयार आहेत. महसूल अधिकाऱ्यांना अचूक पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले आहेत.

बडे उद्योजक व कंपन्यांनी आपल्या सीएसआर फंडातून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन आपण केले आहे. राज्यामध्ये पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री सध्या शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहेत. दर तासाने मीदेखील राज्याचा आढावा घेत आहे. महसूल यंत्रणेतील सर्वांशी बोलत आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सध्या मोठे नुकसान झाले असून, शेतजमीन खरडून गेली आहे. शेतकरी टाहो फोडत आहेत. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये यासाठी त्यांचे पंचनामे होणे आवश्यक आहे. महसूल यंत्रणेने संपूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांच्यामागे उभे रहावे. राज्यात एखादी नवीन योजना किंवा रस्त्याची कामे मागी राहिली तर चालतील पण शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊ. शेतकरी हतबल होऊ नये यासाठी सरकार पुरेपूर काळजी घेईल.

संसार उभे करू! : मराठवाड्यात हाताला आलेले पीक नाहीसे झाल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. पण, त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. शेतकऱ्यांबाबत सरकारला आत्मीयता असून त्यांचे मोडलेले संसार पुन्हा उभे करून देण्याचे काम केले जाईल. त्यासाठी गावकऱ्यांनी देखील अधिकाऱ्यांनी पंचनाम्यासाठी मदत करावी.

विरोधकांनी राजकारणापेक्षा मदत करावी : राज्यातील शेतकरी राजा संकटात आहे. अशावेळी विरोधकांनी राजकारण करून टिका करण्यापेक्षा मदतीसाठी यावे. सरकारला काही चूकत असेल तर सूचना कराव्यात. विनाकारण उणीवा काढत बसून काहीच होणार नाही. ही राजकारणाची वेळ नसून शेतकऱ्यांना मदतीची वेळ आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन मदत करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!