शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण!

मुंबई:- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. स्वतः शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
सध्या राज्यामध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी सर्व नेतेमंडळींना RT-PCR टेस्ट अनिवार्य करण्यात आली होती. याच टेस्ट दरम्यान वर्षा गायकवाड पॉझिटिव्ह आल्याचे समजते आहे. वर्षा गायकवाड यांच्यासोबत अन्य काही आमदारही पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे.
सध्या वर्षा गायकवाड यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. याचसोबत मी लवकरच बरी होईन,आपले आशीर्वाद सोबत ठेवा अशी विनंतीही वर्षा गायकवाड यांनी सर्वांना केली आहे.