मुंबई

कामाची गुणवत्ता पाहिल्यावर त्यासाठी निधी दिल्याचे समाधान वाटते – मुख्यमंत्री

ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्रात विविध कामासाठी निधी दिला आहे. ती कामे प्रत्यक्षात झालेली पाहून, त्यांची गुणवत्ता पाहून त्यासाठी निधी दिल्याचे समाधान वाटते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी, आनंद योग कुटीर आणि हँगिंग गार्डन, रघुनाथ नगर, मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाचे विस्तारीकरण, किसन नगर, स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक रुग्णालय, नळपाडा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (०५ ठिकाणी), नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर (०६ ठिकाणी), मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे ज्येष्ठांचे नंदनवन, हाजुरी, धर्मवीर आनंद दिघे वाचनालय आणि अभ्यासिका, कशिश पार्क, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घाट, उपवन, ग्रीन यात्रेच्या मदतीने झालेलं जेल तलाव पुनरुज्जीवन, सेंट्रल मैदान, ओएनजीसीकडून तलाव साफसफाईसाठी मिळालेल्या यांत्रिक बोटी, राम मंदिर तलाव आणि मोघरपाडा तलाव येथे संगीतमय कारंजे या विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच, रहेजा जवळील उद्यानाचे भूमिपूजनही करण्यात आले.

मुख्यमंत्री झाल्यावर आणि त्याआधी नगरविकास मंत्री असताना धोरणात बदल करून कायद्यात सुधारणा करून योजनांचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. योजनांचा फायदा नागरिकांना मिळावा यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून पाच कोटी लोकांपर्यंत लाभ पोहोचवला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

याप्रसंगी व्यासपीठावर, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, विकास रेपाळे, नम्रता भोसले, मीनल संख्ये, परिशा सरनाईक, गुरुमुख सिंग, आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त जी. जी. गोदेपूरे आणि उमेश बिरारी आदी उपस्थित होते.

मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालयाच्या विस्तारामुळे आणखी ८० रुग्ण खाटा उपलब्ध झाल्या आहेत. या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा परिसरातील नागरिकांना चांगला फायदा होतो आहे. अशा प्रकारचे कॅशलेस रुग्णालय प्रत्येक क्लस्टर प्रकल्पात असावे असे निर्देश आपण आयुक्तांना दिले असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे ज्येष्ठांचे नंदनवन येथे ज्येष्ठ नागरिकांशीही संवाद साधला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!