मुंबई

पत्रकार योगेश त्रिवेदी यांनी ‘पासष्टायन’ सारखी अनेक पुस्तके लिहावीत ; डॉ. मनोहर जोशी

मुंबई, दि.५: गेल्या पस्तीस वर्षांपासून मी योगेश वसंत त्रिवेदी यांची पत्रकारिता पहात आलो आहे. निःस्वार्थी, प्रामाणिक, ध्येयवादी आणि परखडपणे पत्रकारिता कशी करावी याचा आदर्श योगेश त्रिवेदी यांनी घालून दिला आहे.ते केवळ माझे मित्र आहेत म्हणून नाही पण मी त्यांची सामना मधून पत्रकारिता पाहिली आहे. वास्तविक योगेश च्या लेखांची पुस्तके यापूर्वीच यायला हवी होती. पण आज पासष्ठ वर्षाचा योगेश झाला आणि म्हणून ‘पासष्टायन’ हे त्याच्या लेखांचे पुस्तक प्रसिद्ध होत आहे. मी त्याला भरभरुन आशीर्वाद देतो. योगेश ची अनेक पुस्तके यावीत आणि त्यांच्या कडे असलेली माहिती जनतेपर्यंत पोहोचावी, अशा शब्दांत लोकसभेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांनी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांच्या पत्रकारितेचा गौरव केला.

  कोरोनाच्या कालावधीत जानेवारी २०२० ते फेब्रुवारी २०२१  या दरम्यान ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी लिहिलेल्या पासष्टाहून अधिक लेखांचा संग्रह ‘पासष्टायन’ या पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. या ‘पासष्टायन’ चे प्रकाशन लोकसभेचे माजी अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांच्या हस्ते अतीशय घरगुती वातावरणात करण्यात आले. यावेळी डॉ. मनोहर जोशी यांनी आपल्या संघर्षमय जीवनातील अनेक घटनांचा पट उलडगडला, अनेक किस्से सांगितले आणि योगेश त्रिवेदी यांच्या बरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधांचा आवर्जून उल्लेख केला.

कोरोनाच्या वातावरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदी ची घोषणा कधीही होऊ शकते याचे संकेत दिल्यामुळे अत्यंत घाईघाईने हा प्रकाशन घरगुती वातावरणात पार पाडावा लागल्याचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी नमूद केले. ‘पासष्टायन’च्या प्रवासाची थोडक्यात माहिती विजय वैद्य यांनी कथन केली. योगेश त्रिवेदी यांनी डॉ. मनोहर जोशी यांचा शाल, श्रीफळ देऊन तर विजय वैद्य तसेच सहकार आणि समाजवादी चळवळीतले कार्यकर्ते विजय शिंदे यांनीही वयाची पासष्ठ वर्षे पूर्ण केल्या बद्दल त्यांचा डॉ. मनोहर जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आहुति चे संपादक गिरीश त्रिवेदी यांनी आहुति चे विविध विशेषांक यावेळी डॉ. जोशी यांना भेट दिले. राजा शिवछत्रपती परिवार च्या मुंबई संपर्क प्रमुख रेखाताई बोऱ्हाडे, ज्येष्ठ पत्रकार कुनेश दवे, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत लाडे, त्रिवेदी परिवारातील सदस्य, मिलिंद पटवर्धन, राजू चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!