राणीच्या बागेमध्ये सुरु असलेल्या कंत्राटी कामावरून शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने,पालकमंत्री अस्लम शेख यांनी लिहिलं थेट आयुक्तांना पत्र

मुंबई:- मुंबईतील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेमध्ये सुरु असलेल्या कंत्राटी कामावरून शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राणीच्या बागेत प्राण्यांसाठी करण्यात आलेल्या बांधकामात १०० कोटींचा घोळ झाल्याचा आरोप मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी आणि स्कायवे इन्फ्राप्रोजेक्ट या दोन कंपन्यांना मुंबई महानगरपालिका खतपाणी घालत आहेत, असा थेट आरोप शेख यांनी केला आहे.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी देखील अस्लम शेख यांनी याबाबतचे पत्र आयुक्तांना लिहिलं होतं.मात्र, त्या पत्रावर योग्य उत्तर न मिळाल्याने पुन्हा एकदा पालकमंत्री अस्लम शेख यांनी हे पत्र आयुक्तांना लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी राणीच्या बागेमध्ये झालेल्या बांधकामात शंभर कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. आता यावर सत्ताधारी शिवसेनेकडून काय उत्तर मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.