मुंबई

शिवसेना महिला आघाडीचे सुनील केदार यांना जोडे मारो आंदोलन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद करण्याच्या वक्तव्याचा केला निषेध

मुंबई – सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद करु, असे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या सुनील केदार यांच्याविरोधात आज मुंबईत शिवसेना महिला आघाडीने जोडे मारो आंदोलन केले. लाडकी बहिण योजनेचा विरोध करणाऱ्या काँग्रेसी मानसिकतेचा महिला शिवसैनिकांनी धिक्कार केला. या आंदोलनात आमदार यामिनी जाधव, प्रवक्त्या आणि माजी आमदार डॉ. मनिषा कायंदे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यासह शेकडो महिलांनी केदार यांच्या प्रतिमेला जोडे मारले.

परदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याचे भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सुनील केदार विरोधात शिवसेना महिला आघाडीकडून मुंबईतील बाळासाहेब भवन येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. परदेशात जाऊन देशाचा अपमान करणे, पंतप्रधानांबद्दल अपशब्द बोलणे, आरक्षण रद्द करण्याची भाषा नतद्रष्ट काँग्रेसचे लोक करत आहे, अशी टीका डॉ. मनिषा कायंदे यांनी केली. त्या पुढे म्हणाल्या की, नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील जामिनावर सुटलेला आरोपी सुनील केदार याला राज्यातील महिला धडा शिकवतील. काँग्रेस नेत्यांकडून वारंवार महिलांचा अपमान केला. शाहबानो या मुस्लिम महिलेला घटस्फोटातून पोटगी मिळू नये म्हणून काँग्रेसने विरोध केला होता. यातून काँग्रेस महिला विरोधी असल्याची टीका डॉ. कायंदे यांनी केली.

राज्यातील गोरगरिब आणि कष्टकरी महिलांना सरकारकडून दर महिन्याला मिळणारी आर्थिक मदत काँग्रेस नेत्यांच्या डोळ्यांत खुपू लागली आहे. लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून चार पैसे मिळत आहेत, या सावत्र भावांना बघवत नाही. लाडकी बहिण योजना बंद करु असे, विधान करणारे सुनील केदार हे जोडे मारण्याच्याच लायकीचे असल्याचे शीतल म्हात्रे यांनी सांगितले. केदार यांचे सत्तेचे स्वप्न म्हणजे “मुंगेरीलाल के हसीन सपने” असल्याचा टोला त्यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!