सध्या पेपर अथवा टीव्ही वर पर्यावरणावर अनेकजण बोलताना लिहिताना वाचतो. मानवाने स्वार्थासाठी निसर्ग ओरबाडून पर्यावरणाची प्रचंड हानी केली आहे. पृथ्वीचे तापमान वर्षागणीक वाढत आहे. त्याचा पर्यावरणावर प्रचंड दुष्परीणाम होत आहे. औद्योगिकीकरणाने व जंगलतोडी मुळे हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण प्रचंड वाढून धोक्याची पातळी ओलांडली आहे. हिमालय व हिमनद्या वितळत आहेत वगैरे वगैरे…
हे सर्व सत्य आहे व त्याचे परिणाम आपण भोगत आहोत. परंतु वरील बातम्या वाचून व दुःख आणि हळहळ व्यक्त करण्या पलीकडे आपण सर्वसामान्य माणस काही करत नाहीत. तेवढ्या पुरता सर्वांवर राग व्यक्त करतो व शांत बसतो. कोणीतरी यावर उपाय शोधुन काहीतरी करायला पाहीजे अस वाटले म्हणजे आपली जबाबदारी संपली असं होत नाही. कोणीतरी का ? मी का नाही ? असा विचार करणारे फार थोडे असतात.
औद्योगिक प्रगती झालीच पाहीजे. पण पर्यावरण रक्षण व जंगल संरक्षण व संवर्धन कसे होईल हे देखील पाहीले पाहीजे.
‘साथ साथ चॅरीटेबल ट्रस्ट’ने यावर काम करायचे ठरवले आहे. साथ साथ चैरीटेबल ट्रस्ट ही सेवाभावी नोंदणीकृत सामाजिक संस्था आहे व वेळणेश्वर (ता. गुहागर जि. रत्नागिरी) येथे समाजोपयोगी अनेकविध उपक्रम राबवत आहे. आम्ही कोकणात काम करत असताना आमच्या असे पाहण्यात आले आहे की कोकणात अनेक एकर जमिनी ओसाड पडलेल्या आहेत. त्यावर कित्येक वर्षे कोणीही काहीही करत नाही. एक दोन पिढ्या त्या जमिनी अशाच ओसाड आहेत. मी अश्या कित्येक लोकांच्या संपर्कात आलोय ज्यांच्या जमिनी कोकणात आहेत पण नोकरी व्यवसायात शहरांत व्यस्त असल्याने कित्येक वर्षे कोणी गावाला जात नाही, तिथे कोणी रहात नाही त्यामुळे त्या ओसाड पडलेल्या आहेत. अशा लोकापुढे आम्ही असा प्रस्ताव मांडतो की, अशा लोकांनी अशा ओसाड पडलेल्या जमिनी कायदेशीर करार करून आमच्या ट्रस्ट कडे २५ वर्षांसाठी द्याव्यात. जमिनी मुळ मालकाच्याच नावे राहतील. करार करून २५ वर्षासाठी ट्रस्टच्या ताब्यात दिल्यावर आम्ही देणगीदारांच्या व कंपन्यांच्या CSR फंडाच्या माध्यमातून त्यावर जंगल लाऊ. तेथे पर्यावरण पुरक अशा स्थानिक झाडांची लागवड करू. (उदा. वड, पींपळ, उंबर, जांभुळ कडुलिंब, कोकम, बांबू, आंबा, रींगे, हरडा, बेहडा इत्यादी ) कोणत्याही व्यावसायिक उत्पादनाच्या उद्देशाने झाडे लावाणार नाही. थोडक्यात जमिनीचा व्यावसायिक (कमर्शियल) उपयोग करणार नाही.
१०/१२ वर्षात स्थानिक झाडे मोठी होतात व ती हवेतील कार्बन शोषुन प्राणवायू बाहेर टाकतात. पक्षी, प्राणी यांना अन्न मिळते व निवासाची सोय होते. आमची २५ वर्षाची अट त्यासाठीच आहे की १०/१२ वर्षात मोठ्या झालेल्या झाडांचा जंगलाचा पुढील १२/१५ वर्षे पर्यावरणाला खूप मोठा फायदा होईल व निसर्ग चक्र सुरू राहण्यात हातभार लागेल.
मोठ्या प्रमाणावर ओसाड जमिनींचे रूपांतर जंगलात झाल्यास निसर्गाची विस्कटलेली घडी नीट सुरळीत होण्यास हातभार लागेल. आम्हाला कल्पना आहे हे काम सोपे नाही. त्यात अनंत अडचणी, कटकटी व संकटे आहेत. पण पर्यावरणासाठी त्या सहन करायची आमची तयारी आहे.
मी अपणा सर्वांना आवाहन करतो आपल्याकडे अशी वडिजेपार्जीत / स्वतःच्या नावावर सात-बारा असलेली तंटामुक्त ओसाड पडलेली जमिन असल्यास अथवा आपल्या माहीतीत कोणाची असल्यास त्यांना आम्हाला संपर्क करण्यास सांगा. जमीन मुळ मालकाच्याच नावे राहील. फक्त २५ वर्षे त्यावर आम्हाला म्हणजे ‘साथ साथ चॅरीटेबल ट्रस्ट’ ला काम करण्यास परवानगी घा, व २५ वर्षे ती तुम्ही विकणार नाही याची हमी आम्हाला द्या, तसेच पर्यावरणाबद्दल आस्था असलेल्यांनी व मोठ मोठ्या आस्थापनांनी त्यांच्या CSR फंडातून या पर्यावरण पुरक उपक्रमाला सढळ हस्ते मदत करावी. शक्य असेल तर आपणही या उपक्रमात सहभागी व्हावे. “एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ”.
मला खात्री आहे आपण या पर्यावरणपुरक चळवळीला मोलाचे सहकार्य कराल.
संपर्क : शरद शां. जोशी, मुख्य ट्रस्टी,
साथ-साथ चैरीटेबल ट्रस्ट
मोबा० 9869459804.