मिशन मुंबई महानगरपालिका! शिवसेनेला धारेवर धरण्यासाठी भाजपच्या गोटात खलबतं, तर भाजपला चारीमुंड्या चित करण्यासाठी शिवसेना ठरवणार रणनीती

मुंबई:- मुंबई महानगरपालिका निवडणूकांचं बिगूल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. अशात शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर भाजपा नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भातली रणनीती आखण्यात आल्याचे समजते आहे.
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिवसेनेला या निवडणुकीत पराभूत करणार असल्याची प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे. तर घोटाळे, भ्रष्टाचार समोर ठेवून भाजप महापालिकेची रणनिती आखत असल्याचं समोर आलं आहे.
दुसरीकडे शिवसेनेनेही महानगरपालिका निवडणुकीसाठी आपली कंबर कसली असून गेल्या निवडणुकीत दोन नंबरवर राहिलेल्या जागांवर शिवसेना लक्ष केंद्रित करणार आहे.भाजप ज्या ठिकाणी क्रमांक एकवर होता तिथला अभ्यास शिवसेनेनं सुरु केला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे.