कणकवलीत तणावाचे वातावरण,आमदार नितेश राणे यांच्या अटकेच्या मागणीसाठी शिवसेना आक्रमक

सिंदुधुर्ग– आमदार नितेश राणे यांच्या अटकेच्या मागणीसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे.आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. सध्या कणकवलीत तणावाचे वातावरण असून, पोलीस बंदोबस्त कमालीचा वाढविण्यात आला आहे.
नितेश राणे यांच्या अटकेसाठी पोलीस काल रात्रीपासून जंगजंग पछाडत आहेत. दरम्यान राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल, कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, डीएसपी दाभाडे आज सकाळी कणकवलीत दाखल झाले आहेत. या घटनेची इत्यंभूत माहिती घेतल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी सध्या जिल्हा मुख्यालयात असून तेथे बैठक सुरू असल्याचे समजते आहे.
तर दुसरीकडे विधीमंडळ आवारातही नितेश राणे यांच्या अटकेसाठी पोलीसांनी मोठ्या फौजफाटा जमा केल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे आमदार नितेश राणे यांना अटक होतेय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.