शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, मुंबईचे माजी महापौर सुधीर जोशी यांचं निधन

मुंबई:- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, मुंबईचे माजी महापौर तसंच राज्याचे शिक्षण मंत्री सुधीर जोशी यांचं नुकतंच दुःखद निधन झालं आहे. ते ८१ वर्षाचे होते. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.दरम्यान आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते दीर्घ काळापासून आजारी होते.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुधीर जोशी अत्यंत विश्वासू सहकारी होते.शिवसेना वाढवण्यामध्ये सुधीर जोशी यांचा मोलाचा वाटा आहे.
राज्याच्या राजकारणात महत्वाची घौडदौड:-
शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत काम करत असलेले सुधीर जोशी १९७३ मध्ये मुंबईचे महापौर झाले. पुढे पदवीधर मतदारसंघाचे पहिले आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री ही पदेही त्यांनी भूषवली आहेत.
संस्कृत व सुशिक्षित कार्यकर्त्यांचे मोहोळ लाभलेला आणि लोभस व्यक्तिमत्त्व असलेला, एकमेव शिवसेना नेता असं त्यांचं वर्णन केलं जातं. मुंबईचे माजी महापौर सुधीर जोशी यांच्याकडे सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीची धुरा बाळासाहेबांनी सोपविली, ती त्यांनी समर्थपणे सांभाळली.दरम्यान आज त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.