महाराष्ट्रमुंबई

स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज टुरिझम सर्किट’ करा शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत मागणी

राज्यातील गड किल्ल्यांच्या इतिहासाला पर्यटनातून उजाळा मिळणार

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक गड किल्ल्यांचा वारसा भावी पिढीसमोर पर्यटनाच्या माध्यमातून यावा, यासाठी शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्र सरकारकडे स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज टुरिझम सर्किट’ विकसित करण्याची मागणी केली आहे. राज्यातील पर्यटनाच्या दृष्टीने खासदार डॉ. शिंदे यांनी आज लोकसभेत गड किल्ल्यांसदर्भात प्रश्न उपस्थित केला. या संकल्पनेचा केंद्र सरकार विचार करेल, अशी ग्वाही केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिली.

लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्यातील पर्यटनासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रात कोस्टल सर्किट आणि स्पिरिच्युअल सर्किटला केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सहाय्य केले आहे. त्याचधर्तीवर स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज टुरिझम सर्किट’ करण्याची संकल्पना खासदार डॉ. शिंदे यांनी लोकसभेत मांडली.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबधित रायगड, राजगड, सिंहगड, शिवनेरी असे अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत. हे गड किल्ले केवळ इतिहासाच्या दृष्टीनेच नव्हे तर पर्यटन क्षेत्रातही त्यांना प्रचंड महत्व आहेत. ज्या प्रकारे स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून टुरिझम सर्किट विकसित केली जात आहेत तशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबधित या सर्व ऐतिहासिक स्थळांना जोडून छत्रपती शिवाजी महाराज टुरिझम सर्किट विकसित करावे. येथे अत्याधुनिक पायाभूत सेवा सुविधांचा विकास केल्यास पर्यटकांना एक सर्वोत्तम अनुभव मिळेल. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास भावी पिढ्यांना कळेल, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. महाराष्ट्राला स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत कोस्टल सर्किट आणि स्पिरिच्युअल सर्किटला सहाय्य केल्याबद्दल खासदार डॉ. शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.

यावर केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या संकल्पनेचा सरकार विचार करेल, अशी ग्वाही दिली. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार देशातील ऐतिहासिक वारशांचे जतन आणि संवर्धन करण्यास कटिबद्ध आहे. नुकताच सरकारने पुण्यातील शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्कला मान्यता दिली होती. या प्रकल्पाला राज्य सरकारने ५० कोटी रुपये तर केंद्र सरकारकडून ७६ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर अंडरवॉटर म्युझियमसाठी ४६ कोटी रुपये मंजूर केले आहेत.भारताच्या नौसेना ध्वज हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून तयार केला आहे, अशी माहिती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिली. सरकारने वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडे महाराष्ट्र,तामिळनाडूमधील गड किल्ल्यांची एकत्रित यादी सादर केली आहे. भविष्यात ग़ड किल्ले पर्यटनात वृद्धी होईल,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

खासदार डॉ. शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १२२ कोटी, छत्रपती संभाजी नगरमधील ऐतिहासिक पर्यटन क्षेत्रांचा जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी १३२ कोटी अद्याप मिळालेले नाहीत, असे ते म्हणाले. छत्रपती संभाजी नगरमधील हेरिटेज कॉरिडोरच्या संवर्धन व सुशोभिकरणाचा १३२ कोटींचा मास्टर प्लॅन, कोयना नगर गार्डन डेव्हलपमेंट आणि कोयना बॅकवॉटरच्या विकासाचे प्रस्ताव सादर केलेत त्याला कधी मंजुरी मिळेल, असा उपप्रश्न खासदार डॉ. शिंदे यांनी उपस्थित केला. त्यावर पर्यटनाबाबत जे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत त्यावर लवकरच मान्यता दिली जाईल, असे उत्तर मंत्री शेखावत यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!