देश विकलात पण अयोध्या विकता येणार नाही,शिवसेनेची केंद्रावर जहरी टिका

मुंबई- राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे नेहमीच पत्रकार परिषद आणि सामना अग्रलेखातून भारतीय जनता पक्षावर तसेच मोदी सरकारवर टीका करताना दिसून आले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
‘अयोध्येतील भूखंडाचा जो घोटाळा बाहेर आला आहे. तो पाहता भाजपच्या हिंदुत्वात श्रीराम नसून फक्त व्यवहार आहे. त्यांना मंदिर हवे ते बाजूच्या जमिनी लाटण्यासाठी. त्यांचे ढोंग हे असे उघडे पडले ही श्रीरामाचीच कृपा म्हणायला हवी. ईडी, सीबीआयने एखादे कार्यालय आता कायमस्वरूपी अयोध्येतच उघडायला हवे नंतर मथुरा आहेच’,अशी टिका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
‘राम नाम सत्य है’ हे इतरांसाठी. भाजपासाठी फक्त पैसा व जमिनी हेच सत्य आहे, असं म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे. देश विकलात पण, अयोध्या विकता येणार नाही सामनाच्या संपादकीयमध्ये पुढे म्हटलं, “लोकांना वाटले देवाच्या आळंदीत जायचे आहे, पण भाजपवाले चोराच्या आळंदीत घेऊन चालले आहेत. अयोध्येस चोरांची आळंदी करणाऱ्यांना श्रीराम माफ करणार नाहीत!,असे सामना मधून सेनेने म्हटले आहे.
देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही. कारण शिवसेना हिंदुत्वाचा भगवा झेंडा घेऊन उभी आहे. “भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व म्हणजे एकप्रकारचा ‘चोरबाजारा’ आहे हे वारंवार उघड होत आहे. त्या चोरबाजारात आता अयोध्येचा जमीन व्यवहारही सामील झाला आहे. अय़ोध्या निकालानंतर राममंदिर परिसरात भाजप पुढारी, भाजपचे आमदार, महापौर, भाजप गटातील नोकरशाही मंडळींनी वैध-अवैध मार्गाने जमिनी खरेदी केल्या.
मात्र व्यवहार संशयास्पद, तितकेच धक्कादायक आहेत.” असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. लाखांची जमीन ५-१० मिनिटांत १६ कोटींची, अग्रलेखात पुढे म्हटलं, मंदिर उभारणीनंतर या संपूर्ण परिसराचा कायापालट होईल आणि आज घेतलेल्या जमिनीचे भाव शतपटीने वाढतील असा हा धर्माच्या नावावर चाललेला व्यापार आहे. राममंदिरासाठी लढले कोण? रक्त सांडले कोणी? मेले कोण आणि खाणारे कोण? हे गौडबंगालच आहे असे प्रश्न सामनामधून उपस्थित करण्यात आले आहेत.