
मुंबई:‘सरकारच्या कामामुळे काहींना पोटदुखी झाली. सत्ता नाही म्हणून काहींचा जीव कासावीस होत आहे, पण त्यांचं ते बघतील. त्यांच्या दुखण्याला इलाज करायला मी काही डॉक्टर नाही. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा मी राजकीय औषध देईल,’ असं म्हणत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापनदिनी Shivsena Vardhapan Din 2021 भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
शिवसेना वर्धापन दिना निमित्त शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना ॲानलाईन मार्गदर्शन करताना बोलत होते.
‘कोरोना काळातही सुरू असलेलं राजकारण म्हणजे राजकारणाचं विकृतीकरण आहे. अनुभव नसतानाही मी आव्हान स्कीकारलं. या कामाबद्दल माझं कौतुक होत आहे, पण तुमच्या सहकार्याशिवाय ते काम करणं शक्य नव्हतं. कोरोना काळात प्रशासनाने मोठी मेहनत केली आणि जनतेनंही मोठं सहकार्य केलं,’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
हिंदुत्वावरून भाजपला फटकारलं!
शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्यापासून भाजपकडून सातत्याने हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनाला लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी भाजपला सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘हिंदू हा शब्द उच्चारताना अनेकांना कापरं भरत होती तेव्हा बाळासाहेबांनी गर्व से कहो हम हिंदू हैं…असा नारा दिला. माझं हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचं नाही हे मी बोललो…पण हे बाळासाहेबांचं वाक्य आहे. हिंदुत्व म्हणजे कुणाचं पेटंन्ट नाही, हिंदुत्व आमच्या ह्रदयात आहे,’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर अप्रत्यक्षपणे पलटवार केला.
बंगालच्या निवडणूक निकालावर भाष्य
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य करत बंगाली जनतेचं अभिनंदन केलं आहे. ‘बंगाली जनतेचं कौतुक आहे. कारण त्यांनी ताकद दाखवून दिली. निवडणूक काळात अनेक आरोप झाले, पण बंगाली माणसाने आपलं मत ठामपणे मांडलं. बंगाली माणसाने प्रादेशिक अस्मितेचं उदाहरण दाखवून दिलं,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या भाषणावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं. वर्धापनदिनी आपण पक्षाचा म्हणून कोणता राजकीय कार्यक्रम जाहीर केला नाही तर प्रत्येक गाव आणि घर कोरोनामुक्त करा, असं आवाहन आपण करतोय. असं करणारा दुसरा एकही राजकीय पक्ष नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी इतर सर्व राजकीय पक्षांना टोला लगावला.
तीन सण महत्त्वाचे
प्रमोद नवलकर म्हणायचे शिवसैनिकांसाठी तीन सण आहेत, 23 जानेवारी शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस, दुसरा म्हणजे 19 जून शिवसेनेचा वर्धापन दिन आणि 13 ऑगस्ट मार्मिकचा वर्धापन दिन. हे तिन्ही दिवस आपण उत्सवासारखे साजरे करतो आणि केलेच पाहिजे, असंही ते म्हणाले.
स्वबळाचा नारा आपणही देऊ
अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ, ताकद दाखवलीच पाहिजे. आपलं बळ असायलाच हवं. स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास हवाच. आत्मबळ आणि स्वबळ हे शिवसेनेने दिलं आहे. मुंबईत मराठी माणूस क्षुल्लक गोष्ट होती, अपमानजनक जीवन होतं, मात्र बाळासाहेबांनी अंगार फुलवला. मराठी माणसाला स्वाभिमान दिला. स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढणे नाही, तर अभिमानाचं, न्याय हक्क मागण्यासाठी स्वबळ हवं. तलवार उचलण्याची ताकद आधी कमवा, मग वार करा. माझ्यासाठी स्वबळ हे आहे. निवडणुका तर होत असतात. जिंकण हरणं होत असतं. पण हरल्यानंतर पराभूत मानसिकता जास्त धोकादायक आहे, असं ते म्हणाले.