मुंबई,दि.१२: राज्यात लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर कोरोना रूग्णांच्या संख्येत चांगलीच घट होत आहे. त्यामुळे १५ मे पर्यंत लागू केलेले निर्बंध हे ३१ मे पर्यंत वाढवावेत असे मत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज व्यक्त करण्यात आले. त्यामुळे राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला जाईल, असे स्पष्ट सूतोवाच राजेश टोपे यांनी केले.
आरोग्यमंत्री बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषित करतील. राज्यात लॉकडाऊन लावण्याआधी रूग्णांची संख्या ७ लाखापर्यंत पोहोचली होती. मात्र आता ती ४ लाख ७५ हजारापर्यंत खाली आली आहे. देशाचा रूग्णवाढीचा दर १.४ आहे तर राज्याचा ०.८ पर्यंत घसरला आहे. देशातील ३६ राज्यांच्या तुलनेत रुग्णवाढीत राज्य आज ३० व्या क्रमांकावर आहे.
या रुग्णघटीमध्ये निश्चितच निर्बंधाचे सकारात्मक परिणाम दिसून आले असल्याने राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत बहुतांश मंत्र्यांनी निर्बंध पुढे वाढवावेत असेच मत व्यक्त केले आहे. त्यामुळे निर्बंध ३१ मे पर्यंत वाढवले जातील. मात्र याबाबतची अंतिम घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच करतील, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.
१५ मे नंतरच्या निर्बंधांबाबतची मार्गदर्शक सूचना येत्या दोन, तीन दिवसांत जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सध्याच्या निर्बंधात विशेष बदल केला जाईल, असे वाटत नसल्याचे टोपे म्हणाले. सध्या आहे त्या नियमांच्या आधारे राज्यव्यापी लाॅकडाऊन ३१ मे पर्यंत लागू होऊ शकतो. मात्र ज्या जिल्ह्यात रुग्णवाढ मोठी आहे, तेथे स्थानिक प्रशासनाने कडक लाकडाऊन लागू केला आहे. त्यावर याचा परिणाम होणार नाही, असे टोपे यांनी स्पष्ट केले. Yes
५ एप्रिल पासून राज्यात लॉकडाऊन हळुहळु वाढवण्यास सुरुवात केली. त्यास राज्यातील व्यापाऱ्यांच्या संघटनांनी मोठा विरोध केला होता. अनेक जिल्ह्यात राज्य सरकारच्या विरोधात आंदोलने उभी राहिली होती. आता पुन्हा १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याने व्यापाऱ्यांचा विरोध वाढणार आहे.