आदित्य ठाकरे यांचा दौरा पर्यटन विकासासाठी,राजकीय संघर्षासाठी नव्हे-मंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग:पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा राजकीय संघर्षासाठी नव्हता तर पर्यटन विकासासाठी होता. या दौऱ्यात त्यांनी अनेक नव्या प्रकल्पांची घोषणा केली तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील पर्यटन विकासासाठी ११६ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.त्यामध्ये सिंधुदुर्गसाठी २३ कोटी १३ लाख निधी मिळाला. याव्यतिरिक्त वर्षभरात पर्यटन विकासाची विविध कामे सुरू होणार आहेत. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ५० ते ६० कोटी रुपये निधी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्याचे पालकमंत्री सामंत यांनी आज ऑनलाईन पत्रकार परिषद घेत पर्यटनमंत्री ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी पर्यटनमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत हा दौरा राजकीय संघर्षासाठी होता की विकासासाठी होता, याची चर्चा जिल्ह्यात रंगवली जात होती; मात्र हा दौरा राजकीय संघर्षासाठी नव्हता तर पर्यटन विकासासाठी होता, हे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व आहे. या जिल्ह्यात आमचे अधिक आमदार आहेत. त्यामुळे संघर्ष कुणाशी करायची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.