३१ डिसेंबर रोजी ‘या’ वेळेत श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी राहणार बंद

शिर्डी:– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.
राज्यात ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २५ डिसेंबरपासून रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत शिर्डी येथील साईबाबा मंदिर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
त्यामुळे २५ डिसेंबरपासून साई मंदिर रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे. दरवर्षी हजारो भाविक नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक करण्यासाठी शिर्डीमधील साईबाबांचे दर्शन घेतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे भाविकांना साईबाबांच्या दर्शनासाठी मुकावे लागत आहे.
यंदाही कोरोनाचा नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रोन या विषाणूच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साईबाबा मंदिर नवीन वर्षाच्या धर्तीवर मर्यादित वेळे पुरतेच खुले राहणार असल्यामुळे भाविकांचाही हिरमोस झाला आहे.