दोडामार्गात नगराध्यपदासाठी भाजप विरुद्ध भाजप,नारायण राणे काय तोडगा काढणार?

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीत नवा वाद समोर आला आहे. नगराध्यक्ष निवडीसाठी चेतन चव्हाण आणि राजेश प्रसादी या भाजपच्या दोघांनीही अर्ज भरले. मुळात हे दोघेही भाजपचे नगरसेवक आहेत. यांच्यापैकी कुणीही नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेला अर्ज मागे न घेतल्याने सोमवारी १४ फेब्रुवारीला नवे राजकीय नाट्य पाहायला मिळणार आहे.
कसई दोडामार्ग नगराध्यक्षपदी भाजपाचाच उमेदवार विराजमान होणार यात शंका नाही. मात्र या पदासाठी त्यांचेच दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ही निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक आहे. यावरून भाजपातील अंतर्गत वाद उफाळून आल्यानेच दोन गटांचे हे उमेदवार रिंगणात कायम राहिल्याची चर्चा आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? कोणत्या उमेदवाराला पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर करून व्हिप बजावणार? याची उत्सुकता असून चर्चांना उधाण आले आहे.
कसई दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये भाजपचे संख्याबळ १४ आहे. तर दोन नगरसेवक शिवसेनेचे, एक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. भाजपकडे सर्वाधिक नगरसेवक असले तरी बहुमत कोणाकडे जातंय आणि वेळ पडल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाला पाठिंबा देतात, यावर नगराध्यक्ष निवड अवलंबून असणार आहे. त्यामुळे आजपासून प्रत्यक्ष निवडीच्या वेळेपर्यंत दोडामार्गच्या राजकीय क्षेत्रात बऱ्याच घडामोडी घडतील. त्यामुळे कसई दोडामार्ग नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष निवडीत अखेरच्या क्षणी कोण बाजी मारून सिकंदर होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.