महाराष्ट्रमुंबईराजकीय

लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण

२५ लाखाच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत

मुंबई : अकोला येथील १६ वर्षीय मुलाला रक्ताचा कर्करोग झाल्याने त्याच्यावर बोन मॅरो प्रत्यारोपण करणे आवश्यक होते. परंतु उपचाराचा खर्च कुटुंबाला उपचार परवडणारे नव्हते. या संकटाच्या काळात १२ वर्षीय लहान भावाने आपल्या मोठ्या भावाला ‘स्टेम सेल्स दान करून त्याचे प्राण वाचवले. तर आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने पुढाकार घेतल्याने उपचार शक्य झाले.

जीवन (नाव बदलले आहे) हा १६ वर्षीय मुलगा आपल्या आई-वडिलांसह आणि १३ वर्षीय लहान भावासोबत अकोला येथे राहतो. वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही महिन्यांपासून जीवन सतत आजारी पडत होता. सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला पुढील तपासणीसाठी मोठ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे रक्त तपासणीतून जीवनला रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचाराकरिता बोन मॅरो प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. तसेच उपचारासाठी सुमारे २५ ते ३० लाख रुपये खर्चाचा अंदाज वर्तविला. या परिस्थितीत डॉक्टरांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत घेण्याचा सल्ला दिला होता. जीवनच्या पालकांनी तातडीने मुंबई गाठली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षात धाव घेत, कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्याशी संपर्क साधला. श्री.नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार तातडीने कार्यवाही केली. त्यातूनच मुंबई येथील जसलोक रुग्णालयात जीवनवर उपचार सुरू करण्यात आले.

विविध स्रोतांतून मदतीचा हात
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पुढाकारातून, टाटा ट्रस्टच्या मोठ्या योगदानातून तसेच काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने एकूण २५ लाखांची मदत उभी करण्यात आली. ४ सप्टेंबर २०२५ रोजी जीवनच्या १२ वर्षीय लहान भावाने अस्थिमज्जा (स्टेम सेल्स) दान केले आणि त्यानंतर जसलोक रुग्णालयात जीवनवर यशस्वी बोन मॅरो प्रत्यारोपन करण्यात आले.

जीवनप्रमाणे अनेक रुग्णांना मदतीचा हात
जीवनप्रमाणेच अनेक गरीब व गरजू रुग्णांवर संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उपचार करण्यात येत आहेत. दुर्धर आजार झाल्यास कोणीही हताश न होता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी संपर्क साधावा. त्यासाठी नागरिकांनी 1800 123 2211 या क्रमांकावर संपर्क साधावा.
-रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!