मुंबई

वायकरांना क्लीन चिट मिळाल्यानंतर वायकर म्हणाले ‘सत्यमेव जयते’ सोमय्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार

मुंबई – शिवसेनेचे (शिंदे गट) उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिलाला आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी वायकरांना क्लीन चिट मिळाली आहे. मुंबई पोलिसांकडून ही क्लीन चिट देण्यात आली आहे. या प्रकरणी विरोधकांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. तर स्वतः वायकरांनी सुद्धा ‘सत्यमेव जयते’ पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पण या प्रकरणाची तक्रार करणारे आणि आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना रविंद्र वायकर यांच्या क्लीन चिटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थोडक्यात उत्तर दिले. सोमय्या म्हणाले की, “हे प्रकरण सर्वोच्च न्यायलयापर्यंत गेले होते. त्यामुळे मी याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही”. ज्यामुळे आता सोमय्यांना युतीत वायकरांच्या विरोधात बोलणे कठीण होऊन बसल्याचेच यावेळी पाहायला मिळाले आहे.

खासदार रवींद्र वायकर यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला होता. सोमय्या हा फडतूस माणूस आहे. त्याने वायकरांवरील खटला मागे घेतला त्यावर बोलावे. जर हे कोणी सत्यवचनी असतील तर हे भ्रष्टाचारी वॉशिंग मशीनमध्ये घेऊन धुवायचे काम चालू आहे, त्यावर बोलावे. वायकरांसारख्या लोकांवरील खटले कसे मागे घेतले जातात, त्यावर बोलावे. जर तुम्ही खरे असाल, तुमचे रक्त शुद्ध असेल तर बोला. तुम्ही बनावट असाल तर तुम्ही बोलणार नाहीत, असे आव्हान करत राऊतांनी सोमय्यांवर टीकास्त्र डागले होते.

जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी खासदार रवींद्र वायकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. या कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात वायकर यांचा हात असल्याचा आरोप होता. मुंबई महापालिकेच्या 500 कोटी रुपयांच्या जागेवर फाइव्ह स्टार हॉटेलचे बांधकाम केल्याचा आरोप वायकरांवर करण्यात आला होता. मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रिमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा हा आरोप होता. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हा घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर वायकरांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती. त्यामुळे वायकरांनी ईडी कार्यालयात जात या प्रकरणाच्या चौकशीला सामोरे गेले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!