लतादीदींची प्रकृती स्थिर, खोट्या बातम्या न पसरवण्याचं प्रवक्त्यांचं आवाहन

मुंबई -भारतरत्न लता मंगेशकर यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.यातच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. मागच्या ८ जानेवारीपासून लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. कोरोनासोबत त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली आहे.
मात्र, दुसरीकडे डॉक्टर आणि नातेवाईक त्यांचेही पुरेपूर काळजी घेत असताना रविवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या प्रकृतीत अधिकच बिघाड झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. मात्र, लतादीदींची प्रकृती स्थिर असून त्यांच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवू नये, अशी विनंती लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्याने चाहत्यांना केली आहे.
लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवदेनानुसार, त्यांची प्रकृती स्थिर आहे. लतादीदींबाबत खोट्या बातम्या पसरताना पाहून त्रास होतो. त्यामुळे कृपया लक्षात घ्या की, लतादीदींची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. कृपया त्या घरी लवकर परतण्यासाठी प्रार्थना करा, असे ते म्हणाले.
त्याच प्रमाणे त्यांची बहीण आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधताना महत्वपूर्ण माहिती दिली आहे लतादीदी यांची तब्येत जास्त प्रमाणात बिघडली असल्याचे सांगितले जात आहे. पण तसे काहीही नाही. मी, अर्चना, उषा यांनी अर्धा तासापूर्वी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी डॉक्टरांनी आपण सर्वांनी दीदींच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, असे सांगितले.





