रशियाची स्पुटनिक व्ही लस भारतात दाखल !
मुंबई,दि.१:देशात लसीकरणाला वेग आला असताना भारतीय बनावटीच्या कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसीचा प्रचंड तुटवडा भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर रशियातून आलेली स्पुटनिक व्ही लसीची पहिली कन्साईनमेंट हैदराबाद विमानतळावर पोहोचली आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. देशात आजपासून १८ वर्षावरील सर्वांना करोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र काही ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अडथळे येत आहे. अशातच स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप भारतात दाखल झाल्याने येत्या काळात लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे.
सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस वापरली जात आहे. स्पुटनिक व्ही ही भारतामध्ये तिसरी लस उपलब्ध झाली आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. स्पुटनिक व्ही लसीची परिमामकारकता ९२ टक्के असल्याचं सांगण्यात येत आहे. स्पुटनिक व्ही लस एस्ट्राजेनेकाच्या लसीसारखी एक व्हायरल वेक्टर लस आहे. मात्र या लसीचे दोन्ही डोस वेगवेगळे आहेत. या लसीचे दोन डोस वेगवेगळे असल्याने कोरोना वर परिणामकारक बनण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या लसीला आतापर्यंत ६०हून अधिक देशांनी मान्यता दिली आहे.