ज्येष्ठ छायाचित्रकार बाळ मुणगेकर यांचे निधन

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके आणि जागतिक पातळीवरील पहिले मराठी व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’ चे अनेक वर्षांचे छायाचित्रकार श्री. रामचंद्र वासुदेव उर्फ बाळ मुणगेकर यांचे सोमवार, १८ एप्रिल २०२२ रोजी रात्री १० वाजतां मुंबई सेंट्रल येथील नायर इस्पितळात निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी वैदेही, सुपुत्र ऋषिकेश, कन्या ऋतुजा असा परिवार आहे.*
मुत्रपिंडाच्या विकारामुळे बाळ मुणगेकर यांच्या वर मुंबई सेंट्रल येथील बा. य. ल. नायर इस्पितळात गेल्या पंधरा दिवसांपासून उपचार सुरु होते. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इस्पितळात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या बाळ मुणगेकर यांच्या समवेत बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली होती. उद्योग मंत्री सुभाष देसाई हे त्यांच्या तब्येतीची काळजी घेत होते. काल रात्री बाळ मुणगेकर यांचा रक्तदाब अत्यंत खालावला. अखेर रात्री १० वाजतां त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी बोरीवली पूर्व येथील नेन्सी कॉलनी जवळील राहत्या घरी दिवंगत बाळ मुणगेकर यांचे पार्थिव आणण्यात आले.
शिवसेना उपनेते, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, आमदार व विभागप्रमुख विलास पोतनीस, व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर, कलामहर्षि उदय पै, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, संजय घाडी, बाळकृष्ण ब्रिद, भास्कर खुरसुंगे, विनायक सामंत, उत्तर मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय वैद्य, ज्येष्ठ नाट्य समीक्षक संजय डहाळे, आमोद गुप्ते, नाना हळदणकर, प्रकाश दरेकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी बाळ मुणगेकर यांचे अंत्यदर्शन घेतले.
बोरीवली पूर्व येथील दौलतनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाळ मुणगेकर यांनी ‘मार्मिक’ मध्ये अनेक वर्षे छायाचित्रकार म्हणून काम केले. महत्वाच्या घटनांचे ते साक्षीदार होते. ते अत्यंत उत्कृष्ट चित्रकार म्हणूनही ओळखले जात होते. २६ जुलै २००६ रोजी आलेल्या अतिवृष्टीमध्ये त्यांनी काढलेल्या छायाचित्रांंच्या सुमारे पन्नास हजार निगेटिव्ह वाहून गेल्या. त्यांचे पुष्कळ नुकसान झाले. आजारपणात अनेकांनी त्यांना सहकार्य केले. शासनाच्या माहिती विभागाकडून पाहिजे तसे सहकार्य मिळू शकले नाही. पर्यायाने ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेपासून वंचित राहिले. तशी खंत त्यांनी बोलूनही दाखविली. त्यांच्या निधनाबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, उत्तर मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय वैद्य, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर यांनी दुःख व्यक्त करतांना बाळ मुणगेकर यांच्या निधनाने बाळासाहेबांचा लाडका छायाचित्रकार गेला. तसेच एक अतीशय मनमिळावू आणि उत्तम दर्जाचा कलाकार हरपला असल्याची भावना व्यक्त केली.