दहावीचा निकाल जून अखेर: अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे करणार सरसकट उत्तीर्ण
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा
मुंबई,दि.२८:यंदा राज्यात इयत्ता दहावीच्या परिक्षा न होता जूनअखेर निकाल लावण्यात येणार असून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल त्यांच्यासाठी कोविड परस्थिती सुधारल्यानंतर श्रेणी सुधार योजनेअंतर्गत (क्लास इम्प्रुव्हमेंट) दोन संधी देण्यात येणार आहेत. तसेच अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमांवर १०० गुणांची बहुपर्यायी ऑनलाईन सीईटी घेतली जाणार आहे.
दहावीच्या परिक्षेसंदर्भात पालक व विद्यार्थी चिंतेत होते. शुक्रवारी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत मूल्यांकनाचे निकष स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. विभागाने तज्ञांच्या २४ बैठका पार घेतल्या. त्यामध्ये मूल्यांकनाचे निकष निश्चित करण्यात आले आहेत.
२०२०-२१ वषाचा दहावीचा निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत लावण्यात येईल. निश्चित केलेल्या या निकषांनुसार मिळालेले गुण ज्या विद्यार्थ्यांना मान्य नसतील त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यानंतर दोन परिक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे गायकवाड म्हणाल्या.
विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शालेय स्तरावर सात सदस्यांची समिती असेल. विभागीय स्तरावरील अधिकारी निकालाची पडताळणी केली जाईल. एखाद्या शाळेत मूल्यांकनात गैर प्रकार झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक पद्धतीची सीईटी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर अवलंबून असेल. सीईटी १०० गुणांची असून ओएमआर पद्धतीने ती सोडावायची आहे, त्यासाठी दोन तास वेळ असेल.
अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांकडे ज्या जागा रिक्त राहतील त्या जागावंर ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परिक्षा दिली नाही, त्यांचा प्रवेश देताना मूल्यांकनाच्या अाधारे इयत्ता दहावीत मिळालेल्या गुणांचा विचार करण्यात येईल. विविध बोर्डांंच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या पद्धती वेगळ्या असल्याने अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शाळांनी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठीचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. १७ नंबर तसेच रिपीटर विद्यार्थी यांच्यासाठी देखील मूल्यमापन धोरण निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. यंदा १० वीला राज्य मंडळाचे १४ लाख आणि सीबीएसईचे २५ हजार विद्यार्थी होते.
गुण पद्धती:
१.विद्यार्थ्यांचे इयत्ता १०वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील.
२. विद्यार्थ्यांचे इयत्ता १० वीचे गृहपाठ, तोंडी परीक्षा, प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण देण्यात येतील.
३. विद्यार्थ्यांचा इयत्ता ९ वी च्या अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी ५० गुण याप्रमाणे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
४.अशा प्रकारे दहावीच्या प्रत्येक विषयाचे मूल्यमापन १०० गुणांत करण्यात येणार आहे.





