
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशभर भाजपची घोडदौड चालू असताना काँग्रेसच्या पदरात जी काही चार-पाच राज्ये पडली तेथे सत्ता टिकवतानाही काँग्रेसची दमछाक झाली. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे. सन २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाबच्या मतदारांनी काँग्रेसला कौल दिला आणि मुख्यमंत्रीपदी अपेक्षेप्रमाणे कॅप्टन अमरिंदर सिंग यांची निवड झाली. ११७ सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे ८० आमदार आहेत. सुरुवातीची दोन वर्षे सुरळीत गेली, पण त्यानंतर भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या नवज्योत सिंग सिद्धूला काँग्रेस श्रेष्ठींनी महत्त्व द्यायला सुरुवात केली. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. कॅप्टन सिंग हेच मुख्यमंत्रीपदी असतील हे पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केले आहे, पण त्याचवेळी प्रदेशाध्यक्षपद महत्त्वाकांक्षी सिद्धूकडे सोपवून श्रेष्ठींनी दोघांमध्ये कुस्ती लावून दिली आहे.
नवज्योत सिंग सिद्धू हा उत्तम क्रिकेटपटू म्हणून देशाला परिचित आहे. क्रिकेटच्या मैदानावर षटकार मारणारा आणि आपल्या फलंदाजीने मैदान दणाणून सोडणारा सिद्धू आता राजकारणाच्या मैदानात मनसोक्त खेळू बघत आहे. भाजपने त्यांना मानसन्मान दिला, भाजपच्या तिकिटावर तो अमृतसरमधून तीन वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आला. नंतर त्याला राज्यसभेवरही खासदार केले. पण सिद्धू भाजपमध्येे अतृप्त व अशांत राहिला. आपला अमृतसर लोकसभा मतदारसंघ भाजपने दिवगंत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांना दिला व त्याला लोकसभेला तिकीट नाकारले, हा त्याचा भाजपवर राग होता. भाजपला जेटली केव्हाही जवळचे व उपयुक्त होते. ‘मॅन फाॅर आॅल सीझन’ असे जेटली होते. अरुण जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून संघ परिवाराशी जोडलेले होते. सिद्धू हा क्रिकेटमधील कारकीर्द संपल्यावर राजकारणाकडे वळला व त्याने भाजपची कास धरली. आपण लोकप्रिय आहोत, याचा सिद्धूला आजही गर्व आहे. तो एक उत्तम कलाकार व चांगला वक्ता आहे. गर्दीला आकर्षित करणारा नेता आहे. येत्या निवडणुकीत कॅप्टनपेक्षा नवज्योत सिंग सिद्धूची पक्षाला जास्त मदत होईल, असा समज सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका यांचा झालेला दिसतो. त्यामुळेच सिद्धूला प्रदेशाध्यक्ष हे मानाचे पद दिले आहे. या पदाची सूत्रे स्वीकारत असताना कॅप्टन यांनी उपस्थित राहून सिद्धू यांना शुभेच्छा दिल्या.
साडेचार वर्षांपूर्वी भाजपवर नाराजी प्रकट करीत सिद्धूने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच्या टीव्ही शोमुळे व कि्रकेटच्या मैदानावरील तडाखेबंद फलंदाजीमुळे त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. तो जाईल तेथे गर्दी जमते. तो एक उत्तम अभिनेता असल्याने गर्दीला खिळवून ठेवण्याचे व लोकांना उत्सािहत करण्याचे त्याला तंत्र चांगले अवगत आहे. ज्या घिसाडघाईने काँग्रेस श्रेष्ठींनी सिद्धूला पंजाबमध्ये प्रदेशाध्यक्षपदावर नेमले ते मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुळीच पसंत पडलेले नाही. कॅप्टनचा स्वभाव धीरगंभीर आहे, तर सिद्धूचा स्वभाव उथळ आहे. कॅप्टनचे वय ७९ आहे, तर सिद्धूचे ५७ आहे.
सिद्धू हा काही कॅप्टनला विचारून पंजाबात राजकारण करीत नाही. ज्या गोष्टीतून आपल्याला काही साध्य होईल, अशा कल्पकतेने तो डावपेच खेळत असतो. आपली प्रतिमा कशी उंचावेल, आपली लोकप्रियता कशी वाढेल यावर त्याचे लक्ष्य केंदि्रत असते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सुरुवातीपासूनच सिद्धूला प्रदेशाध्यक्ष नेमायला विरोध केला होता. सोनिया गांधींना पत्र पाठवून सिद्धूला प्रदेशाध्यक्षपदी नेमले, तर पक्षात फूट पडू शकते, असा धोक्याचा कंदीलही दाखवला होता. कॅप्टनचा म्हणजेच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध झुगारून सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या किल्लेदारपदावर पक्षाने नेमणूक केली आहे.
कॅप्टनच्या सरकारमध्येे असतानाच सिद्धू त्यांच्या विरोधात बोलत होता. मुख्यमंत्री लोकांना वेळ देत नाहीत, निर्णय लवकर घेत नाहीत, जनतेत मिसळत नाहीत, असे आरोप सिद्धू उघडपणे करीत होता. तेव्हाच कॅप्टनने २०१९ मध्ये त्याचे खाते बदलून टाकले व त्याचा राग येऊन सिद्धूने मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून त्याने आपले टार्गेट प्रदेशाध्यक्षपद ठेवले व सोनिया, राहुल व प्रियंकाकडून मिळवले. पंजाबमध्येे ५७.७५ टक्के शीख आहेत व ३८.४९ टक्के हिंदू आहेत. म्हणूनच प्रदेशाध्यक्षपदावर हिंदू चेहरा असावा, असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे मत होते. प्रदेशाध्यक्षपद मिळताच, जित्तेगा पंजाब अशी घोषणा सिद्धूने दिली. हायकमांडने दिलेला अठरा कलमी कार्यक्रम आपण राबवणार असल्याचे जाहीर केले. पण मुख्यमंत्र्यांकडे जाऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत, असे त्याला वाटले नाही आणि मुख्यमंत्रीही त्याला आपणहून जाऊन भेटायला गेले नाहीत. सिद्धूचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जालंदर, पतियाळा, अमृतसर, चंदिगढ सर्वत्र मोठे स्वागत झाले.
मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांविषयी सिद्धूने प्रथम त्यांची जाहीर माफी मागावी, मग त्यांना भेटायला यावे, अशी कॅप्टन समर्थकांनी मागणी केल्यामुळे पक्षात उघडपणे दोन गट पडले आहेत. कॅप्टन हे वयोवृद्ध आहेत, सिद्धू तरुण आहे, असाही प्रचार होतो आहे. विधानसभेची निवडणूक सात महिन्यांवर आली आहे. जेव्हा तिकीट वाटपाची वेळ येईल, तेव्हा दोन गटांत संघर्ष विकोपाला जाईल. आपले वडील काँग्रेसचे जुने नेते होते, ते काँग्रेसचे आमदार होते, याची आठवण सिद्धू करून देत आहे. सिद्धू हा काही प्रदेशाध्यक्षावर समाधानी असणार नाही, त्याचे लक्ष्य मुख्यमंत्रीपदावर आहे. कॅप्टन आणि सिद्धू एकाच म्यानात दोन तलवारी कशा राहणार, हीच खरी मेख आहे.
राहुल गांधींनी सिद्धूच्या गळ्यात काँग्रेसी पट्टा घालतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. राहुल त्याला म्हणतात – तू ने ही मेरा नाम पप्पू रखा था, आज मै तेरे गले में पट्टा डालकर अपना टाॅमी बनता हूँ…, वक्त बहुत बलवान होता हैं.
सुकृत खांडेकर
([email protected])