महाराष्ट्रक्रीडामुंबई

दिंडोशी मध्ये आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

मुंबई : शिवसेना-युवासेना दिंडोशी विधानसभा पुरस्कृत गोकुळवन मित्र मंडळ आयोजित आमदार चषक कबड्डी स्पर्धेत संघर्ष, ओम साई, जगदंब आणि नेताजी सुभाष या मंडळांनी दमदार विजयासह सलामी दिली.

दिंडोशीतील गोकुळवन मित्रमंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आमदार चषक द्वितीय श्रेणी पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी जोगेश्वरीचे आमदार बाळा नर, उपनेते अमोल कीर्तिकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, विभाग संघटक – प्रशांत कदम, उपविभागप्रमुख भाई परब, माजी उपमहापौर सुहास वाडकर, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, शाखाप्रमुख संपत मोरे, संदीप जाधव उपस्थित होते. ३२ संघांचा समावेश असलेल्या या तीनदिवसीय स्पर्धेच्या उद्घाटनीय दिवशी जगदंब मंडळाने पार्ले क्रीडा केंद्राचा ३२-१४ असा धुव्वा उडवत दणदणीत सलामी दिली. बोरिवलीच्या ओम साई मंडळाने स्वयंभू क्रीडा मंडळाचाही ३०-१० असा फडशा पाडला. मालाडच्या नेताजी सुभाष संघाने पार्त्याच्या गुरू गजानन मंडळाचाही ३३-१० असा सहज पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले.

साऱ्या लढतीत एकतर्फी होत असताना संघर्ष आणि युवा क्रीडा मंडळामध्ये झालेल्या लढतीत कबड्डीप्रेमींना काहीसा दिलासा मिळाला. संघर्षने ७-५ अशी आघाडी घेत सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला. मग दुसऱ्या डावातही संघर्षने जोरदार चढाया करत आपली आघाडी कायम ठेवली आणि २५-१७ अशा फरकाने सामना आपल्या खिशात टाकला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!