सणासुदीत पाण्यासाठी संघर्ष: दिवाळी पहिली आंघोळ बादली मोर्चा सह करण्याचा इशारा!

संदिप सावंत
ऐन दिवाळी सणासुदीच्या काळात गोरेगाव पश्चिम येथील पी-दक्षिण विभागातील प्रभाग ५२ मधील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र संघर्ष करावा लागत आहे. धरणे पूर्ण भरलेली असतानाही गेल्या अनेक दिवसांपासून, किंबहुना महिना होऊनही गोकुळधाम कॉम्प्लेक्स, पूर्वेकडील गोकुळधाम सारख्या परिसरांमध्ये पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पाण्याचा दाब कमी असल्याने अनेक सोसायट्यांमध्ये पाणी चढतच नाही, त्यामुळे हजारो नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी टँकरवर किंवा पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
पी-दक्षिण विभागाच्या साहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयावर ‘बादली मोर्चा’ पाण्याच्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाखाप्रमुख, श्री. संदीप पंढरीनाथ गाढवे, यांनी एक तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
”सणासुदीच्या काळातही जर नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असेल, तर याहून मोठे दुर्दैव नाही. नागरिकांच्या भावनांचा विचार करून, जर रविवारपर्यंत या विभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर सोमवार, सकाळी ११ वाजता पी-दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयावर ‘बादली मोर्चा’ काढण्यात येईल,” असे श्री. गाढवे यांनी ठामपणे सांगितले.
दिवाळीची पहिली आंघोळ कार्यालयात करणार!
या आंदोलनाचे स्वरूप अत्यंत लक्षवेधी असणार आहे. प्रभाग ५२ मधील सर्व इमारतींमधील नागरिक आणि सभासद या ‘बादली मोर्चा’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, पाण्याचा प्रश्न महिना उलटूनही सुटत नसल्यामुळे संतप्त झालेले हजारो नागरिक दिवाळीच्या तोंडावर आपली ‘दिवाळीची पहिली आंघोळ’ चक्क पी-दक्षिण महानगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन करणार आहोत असे स्थानिक नागरिक दीपक परब यांनी सांगितले आहे.
’जोपर्यंत पाणी मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या’
गाढवे यांनी प्रशासनाला आव्हान दिले आहे की, जोपर्यंत नागरिकांच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवली जात नाही, तोपर्यंत हे सर्व नागरिक कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार आहेत. या गंभीर प्रश्नामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि असंतोष वाढत असून, सणासुदीच्या काळात हा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.