महाविकास आघाडीला धक्का! सुप्रीम कोर्टाने रद्द केलं १२ आमदारांचे निलंबन

नवी दिल्ली:- तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत सुप्रीम कोर्टाकडे दाद मागितली. यावर आज सुप्रीम कोर्टाने महत्वाची सुनावणी देत १२ आमदारांचे निलंबन रद्द केलं आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राडा केल्याने, अध्यक्षांना शिवीगाळ केल्याने तसंच तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप करत, भाजपच्या बारा आमदारांचं ५ जुलै २०२१ रोजी वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने हे निलंबन रद्द करत राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे. ‘अशाप्रकारचे निलंबन करणे म्हणजे लोकशाहीमध्ये चुकीचा पायंडा पडू शकतो. आमदारांना ६० दिवसांपेक्षा निलंबित करणे म्हणजे तो बडतर्फ झाल्यासारखे आहे. त्यामुळे कुठलाही मतदारसंघ हा सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ विनाप्रतिनिधी राहणं अयोग्य आहे. म्हणूनच आमदारांचं १ वर्षासाठी निलंबन करणं चुकीचं आहे’, असंही कोर्टाने नमूद केलं होतं.