नितेश राणे यांची अटक अटळ! सुप्रीम कोर्टाने राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला

नवी दिल्ली:- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यांचा आरोप असलेल्या आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टानं मोठा धक्का दिला आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने देखील त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांची अटक अटळ आहे.
सुप्रीम कोर्टानं निलेश राणे यांना शरण येण्यास दहा दिवसांची मुदत दिली आहे. या दहा दिवसात जर नितेश राणे शरण आले नाहीत तर त्यांना पोलिसांमार्फत अटक करण्यात येईल. त्यामुळे आता नितेश राणे यांना अटकेपासून कुणीही वाचवू शकत नाही,हे आता निश्चित झालं आहे.
काय आहे प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रकरणी शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. ‘या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार नितेश राणे असून त्यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला झाला आहे’, असा आरोप संतोष परब यांनी केला होता. यानंतर नितेश राणे यांना अटक करण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. याच दरम्यान नितेश राणे अज्ञातवासात गेले. दुसरीकडे सिंधुदुर्ग सत्र न्यायालय त्यांना काहीसा दिलासा दिला होता. यानंतर त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला गेला. नितेश राणे यांनी थेट यानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यावर आज सुप्रीम कोर्टाने सुनावणी देत नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता त्यांना अटक होउ शकते.