ओबीसी समाजाचा संसदेत ९८ टक्के अचूक असणारा डाटा कोर्टात सदोष कसा होतो, सुप्रिया सुळेंचा सवाल

नवी दिल्ली – ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारला आज सर्वोच्च न्यायालयात जोरदार झटका बसला आहे. न्यायालयाच्या आजच्या निर्णयानं केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळवण्याची आशाही मावळली आहे. या निर्णयानंतर त्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत, केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, केंद्र सरकार संसदेत एक आणि कोर्टात दुसरीच भूमिका घेत आहे. संसदेत अचूक असणारा डेटा कोर्टात मात्र सदोष कसा होतो,याचे उत्तर केंद्र सरकारला द्यावे लागणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ओबीसींचे आरक्षण कायम रहावे यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे इंपिरिकल डेटा मागितला आहे. याबाबत महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली होती. परंतु केंद्र सरकारने हा डेटा सदोष असल्याने तो राज्यांना देता येणार नाही अशी भूमिका न्यायालयात घेतली. भारताचे महारजिस्ट्रार आणि जनगणना आयुक्त कार्यालय व केंद्रीय गृहमंत्रालय यांनी स्थायी समितीला दिल्याप्रमाणे ‘हा डेटा तपासण्यास आला असून व्यक्ती, त्यांची जात आणि धर्म यांची त्यात बिनचूक नोंद असून तो ९८.८७ टक्के अचूक आहे.
जनगणना आयुक्त कार्यालयाने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार एकूण 1 अब्ज, 18 कोटी, 64 लाख, 3 हजार 770 नोंदींपैकी केवळ 1 कोटी 34 लाख 77 हजार 30 एवढ्या नोंदी सदोष आढळून आल्या होत्या आणि याबाबत सुधारणा करण्याबाबत राज्यांना सूचित करण्यात आले होते. याचाच अर्थ केंद्र सरकार संसदेत एक आणि कोर्टात दुसरीच भूमिका घेत आहे.सं सदेत अचूक असणारा डेटा कोर्टात मात्र सदोष कसा होतो,याचे उत्तर केंद्र सरकारला द्यावे लागणार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.