बुलेट चोरी प्रकरणी संशयीत न्यायालयीन कोठडीतुन पोलीस कोठडीत

सिंधुदुर्ग- बुलेट चोरी प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघा युवकांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कुडाळ-शिवाजी पार्क येथे राहणारे पोलीस हवालदार अनिल लवू पाटील यांची हि बुलेट गाडी १२ जुलै रोजी चोरीस गेली होती. त्याबाबत पोलिसात तक्रार दाखल होऊन या प्रकरणी ज्ञानेश्वर हेमंत जाधव (२२, रा. नुल-गडहिंग्लज) आणि ओंकार दिनकर गायकवाड (२०, रा. नुल-गडहिंग्लज) याना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी कुडाळ न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली होती. त्या विरोधात कुडाळ पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील केल्यावर त्या दोन्ही संशयितांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
याबाबत हकीकत अशी कि, कुडाळ शहरातील तुपटवाडी येथील शिवाजी पार्क या गृहनिर्माण प्रकल्पात राहणारे कुडाळ पोलीस ठाण्याचे हवालदार अनिल लवू पाटील यांच्या मालकीची बुलेट ही १२ जून २०२४ रोजी रात्री ९.३० ते १३ जून रोजी सकाळी ९ या मुदतीत चोरीला गेली होती.याबाबत पाटील यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या चोरीबाबत कुडाळ पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग हे संयुक्तपणे तपास करीत होते.दरम्यान,पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास करणारे कुडाळचे हवालदार सचिन गवस यांनी हवालदार बस्त्याव भुतेलो,अनिल पाटील यांच्या मदतीने तपास सुरू केला. त्यांना हवालदार प्रीतम कदम व कृष्णा केसरकर यांनी सहाय्य केले. कुडाळ शहरातील बस स्थानकासमोरील एका हॉटेल समोरील सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यात गडहिंग्लज येथून भाजी घेऊन कुडाळला येणाऱ्या टेम्पोतून उतरून एक व्यक्ती शिवाजी पार्कच्या दिशेने चालत जाताना दिसला होता. पोलिसांनी या टेम्पो मालकाचा कसून शोध घेत त्याच्याकडे तपास केला.
यावेळी येथील एका लॉ कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला आपण त्या ठिकाणी आणून सोडल्याचे त्या टेम्पो मालकाने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी या लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला.तर हा विध्यार्थी शिवाजी पार्क याच गृहप्रकल्प येथे,भाडेकरू म्हणून राहत असल्याची माहिती समोर आली.त्याच एरियात राहून चोरीच्या उद्देशाने पाळत ठेऊन त्याने चोरी करण्याचा सापळा रचला हे निदर्शनास आले.संबंधित विद्यार्थी हा कोल्हापूर जिल्हयातील गडहिंग्लज तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले.याकामी पोलिसांनी गडहिंग्लज परिसरात जात या संशयितांचा शोध घेत शुक्रवारी मध्यरात्रीनंतर त्यांना ताब्यात घेतले.तसेच बुलेटही हस्तगत केली. त्यांनंतर याना कुडाळ न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.
या प्रकरणी कुडाळ पोलिसानी जिल्हा सत्र न्यायालयात अपील करून या दोघांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. कारण या गाडीचे अनेक स्पेअरपार्ट काढण्यात आले होते. नंबर प्लेट बदलण्यात आली होती. बुलेटचा लोगो गायब होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने या दोघांना १७ जुलैपर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली हवालदार सचिन गवस, तसेच प्रीतम कदम हे अधिक तपस करीत आहेत.