खाणं आणि कलेचे अद्वैत साधणारे स्वादआर्ट

घर पाहावे बांधून आणि व्यवसाय पाहावा करून ही सर्वसाधारण प्रत्येक नोकरदार माणसाची इच्छा किंवा मानसिकता असते. घर बांधणे किंवा ते विकत घेणे हे स्वप्न बरेच जण आपापल्या ऐपतीप्रमाणे पूर्ण करतात पण व्यवसाय? नोकरदार वर्गातील नागरिक फारच कमी वेळा याकरिता पुढाकार घेताना दिसतात. पण ‘खाणं ही सुद्धा कला आहे’ हे आयुष्याचे ब्रीद मानणाऱ्या आणि खाण्यावर अतिशय प्रेम असणाऱ्या विद्या व निनाद गोगटे यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात स्वादआर्ट या खाद्यसेवेची सुरुवात केली. जिभेवर रुंजी घालणारे चमचमीत, चविष्ट पदार्थ तितकेच आरोग्यदायी आणि पौष्टिकही असू शकतात हे गोरेगावातील स्वादआर्टने आपल्या खाद्यसेवेतून वेळोवेळी पटवून दिले. कोकणातील उत्पादकांचे साठवणीचे घरपोच पदार्थ, स्वतःचे खाद्यपदार्थांचे दुकान, पुढे केटरिंग सेवा ते सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या उत्पादनांची विक्री हा स्वादआर्टचा गेल्या वर्षभरातील आलेख अत्यंत प्रेरणादायी आहे.
आर्टलाईन ग्राफिक्सद्वारे उत्तम ग्राफिक आर्टीस्ट व्यावसायिक म्हणून कार्यरत असणाऱ्या विद्या गोगटे आणि मार्केटिंगमध्ये अनेक वर्षे कार्यरत निनाद गोगटे या दाम्पत्याने २०२०मध्ये स्वादआर्ट या नावाने व्यवसायाची सुरुवात केली. “इट्स ऑल अबाऊट द नीड” कोकणातले उत्तम पदार्थ लोकांना हवे आहेत ही गरज लक्षात आल्यावर ते पदार्थ त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्यास सुरुवात केली. केवळ ५००० रुपयांच्या भांडवल गुंतवून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. व्हाट्सऍपच्या माध्यमातून पूर्वनोंदणी पद्धतीने माल मागवून विक्री सुरू केली. ग्राहकांचा या उपक्रमाला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला. या अंतर्गत कोकणातील योजक, रसमाधुरी, मधुमिलिंद या उत्पादकांच्या पारंपरिक उत्पादनांची घरपोच विक्री सुरू झाली.
हे सुरळीत सुरू असताना कोकणातून सँपल स्वरुपात स्वादआर्टकडे लाडू, करंजी, शेव आणि शंकरपाळे आले. चव आणि दर्जा पाहून हे पदार्थही ग्राहकांपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला. यानिमित्ताने मुंबईतील व्यावसायिक फराळापेक्षा वेगळा असा आई-आजी-काकूच्या हातच्या पारंपरिक चवीचा फराळ दिवाळीच्या वेळेस कोकणातून ग्राहकांना घरपोच मिळाला. केवळ मुंबईच नव्हे तर बंगळुरूलाही पोहोचला. पोहोचण्यास अत्यंत दुर्गम अशा नागालँडमधील सैन्यतळावर आणि परदेशी सिंगापूरमध्येही रवाना झाला. कोरोनाच्या पहिल्या तडाख्यातून सावरण्याआधीच कोकणाला आणखी एक तडाखा बसला तो निसर्ग चक्रीवादळाचा. अनेक ठिकाणी वाताहत झाली. अशा वेळी कोकणातल्या माणसाला काय हवे होते ? पुन्हा उभे राहण्यासाठी आम्ही आहोत ना मदतीला असे आश्वस्त करणारे सूर. पैशाने मदत करू शकत नसलो तरी त्यांनी केलेले उत्तम पदार्थ विकायला हातभार लावणे सहज शक्य होते. साठवणीचे पदार्थ आणि दिवाळी फराळ यामुळे हा हातभार लावणे शक्य झाले.
पुढे १ फेब्रुवारी २०२१ रोजी गोरेगाव पूर्वेला स्वादआर्टच्या दुकानाची सुरुवात झाली. कोकणातील पारंपारिक उत्पादने, साठवणीचे पदार्थ, फराळाचे पदार्थ, श्रीखंड अशा अनेक उत्पादनांची विक्री या दुकानाच्या माध्यमातून सुरू झाली. यात आंब्याची-फणसाची साठं, तळलेले गरे, आटवलेला रस, कुळीथ पीठ, सांडगी मिरची, पोहा-उडीद पापड, आमसुलं, कोकम आगळ, गूळबुंदी लाडू, हातसडीचे लाल तांदूळ, वाल, हळद, तिखट , बारीक गावठी मटकी या व अशा अनेक उत्पादनांचा अंतर्भाव होता. काही उत्पादक हे अत्यंत घरगुती स्वरुपात उत्पादन करीत होते त्यांना थेट ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहोचवायला मदत झाली. कालांतराने गहू, तांदूळ, चणा डाळ वेगवेगळ्या तयार पिठांचाही अंतर्भाव या उत्पादनांमध्ये करण्यात आला.
गावावरून येणाऱ्या बहुतांश सर्वच पदार्थांची मागणी हळू हळू जोर धरू लागलीच होती आणि अचानक कोरोनाची दुसरी लाट आली. सगळीच गणिते बिघडण्याची चिन्हे दिसू लागली. त्यात संपूर्ण गोगटे कुटुंबच कोरोनाग्रस्त झाल्यावर नव्याने सुरू केलेले दुकान बंद कसे ठेवायचे या विवंचनेत होते. काय करावे या प्रश्नाचे उत्तर शोधत असतानाच “अवधूत” हे नावाप्रमाणे दत्त म्हणून पाठी उभे राहिले. स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी हे दुकान सुरू ठेवले. एचआर कन्सल्टंट असलेले आणि मुळात एक उत्तम कूक असणारे अवधूत गायतोंडे आज स्वादआर्टचे समर्थकच नाही तर भागीदारसुद्धा आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दुकानाचे भाडे सुरू होते आणि पण गिऱ्हाईक मात्र कमी येत होते. ग्राहक तुमच्याकडे येत नसेल तर आपणच त्यांच्यापर्यंत पोहोचायचे असे स्वादआर्टने ठरवले. या निमित्ताने साठवणीच्या पदार्थांसोबतच स्वादआर्टची केटरिंग सेवेलाही सुरुवात झाली. मे महिन्यात “रविवार पोटभर सकाळ” हा एक नाश्त्याचा उपक्रम राबवला. ९ मे २०२१ रोजी पोटभर सकाळ अंतर्गत मिसळीची पहिलीच १००हून अधिक प्लेट्सची ऑर्डर पूर्ण केल्यानंतर ठामपणे आणि आत्मविश्वासाने केटरिंग व्यवसायात उतरण्याचा निर्णय स्वादआर्टने घेतला. दरम्यानच्या काळात कोविडमुळे विलगीकरणात असणाऱ्या काही व्यक्तींकडून डब्यांसाठी विचारणा झाली होती. सुरुवात दुपारच्या डब्याने केली ते आता दुपार रात्रीचे डबे, आठवड्यातील ३-४ दिवस रात्रीचे स्पेशल मेन्यू , रविवार दुपारचे चमचमीत हटके मेन्यू याला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. चविष्ट तरीही आरोग्यपूर्ण आणि तोंडाला चव आणणाऱ्या या टिफीन सेवेला सुरूवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला, आजही मिळतो आहे. आठवडाभर ऑफिसचे काम करून थकलेल्यांना ‘रविवारी काय वेगळे करू?’ हा विचार करायला अनेकदा वेळही नसतो. स्वादआर्ट सकाळ अनेक पारंपरिक व कल्पक न्याहारीच्या पदार्थांची भेट घेऊन येते. आंबोळी, नाचणी इडली, मिश्र कडधान्य मिसळ, दडपे पोहे, साबुदाणा खिचडी, भाजणीचे थालिपीठ, दडपे पोहे अशा वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद अनेकांनी घेतला आहे, घेत आहेत.
२०२१च्या नारळीपौर्णिमेच्या दिवशी स्वादआर्टने केटरिंगसाठी नवी जागा घेतली. पोळी, भाजी, भात, आमटी, कोशिंबीर अशा दैनंदिन डब्यासह वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने अनेक पारंपरिक पदार्थांचा आस्वाद या निमित्ताने ग्राहकांना घेता येतो. नैवेद्याच्या स्वयंपाकासह पुरणपोळी, गूळपोळी, ओल्या नारळाची करंजी, उकडीचे गुळाच्या सारणाचे मोदक, गुळाचा खरवस, स्वादिष्ट बासुंदी, लेकुरवाळी भाजी, ऋषिची भाजी असे अनेक पदार्थ ग्राहकांना त्या त्या सीझनमध्ये ऑर्डरप्रमाणे पुरवले जातात. त्याचप्रमाणे हाऊसपार्टी, स्नेहभेटी, लग्नाच्या निमित्ताने ग्रहमख-केळवण, हळद, बॅचलर्स-स्पिन्स्टर पार्टी, साखरपुडा, डोहाळेजेवण, वाढदिवस, सत्यनारायण पूजा अशा अनेक छोट्या छोट्या कार्यक्रमांसाठी भोजनासह केटरिंग सेवाही पुरवली जाते. पारंपरिक शाकाहारी जेवणाप्रमाणेच मांसाहारींसाठीही बिर्याणी, स्टार्टर्समधील विविध प्रकारचे पदार्थ ऑर्डरप्रमाणे तयार केले जातात. दैनंदिन डब्यांच्या शाकाहारी मेन्यूप्रमाणे ठराविक दिवशी मत्स्यप्रेमी व मांसाहारींसाठी वेगळे अन्नपदार्थ केले जातात. शहाळे तवा फ्राय भाजी, व्हेज-नॉन व्हेज बिर्याणी, खरवस, भाकरी पिझ्झा तसेच विविध खाद्यसंस्कृतीतील पदार्थही तयार केले जातात.
स्थानिक फळे खा आणि ऋतूमानानुसारच खा, असे आपल्या आहारशास्त्रात सांगण्यात आले आहे. कोकणातल्या शेतकऱ्याला सुगीचे दिवस तेव्हाच येतील जेव्हा तिथला माल ग्राहक डायरेक्ट विकत घेईल. म्हणूनच, स्थानिक शेतकऱ्यांनी, बागायतदारांनी ऋतुमानानुसार पारंपरिक आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या आंबे, फणस, ओले काजू, द्राक्ष, मोसंबी, स्ट्रॉबेरी अशा फळांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम स्वादआर्टद्वारे केले जाते. विशेष म्हणजे संबंधित उत्पादने ही सेंद्रीय पद्धतीने पिकवली असल्याचे प्रमाणपत्र तपासून, मगच ही फळे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जातात. भोगीच्या निमित्ताने गावांतून खाल्ला जाणारा बोरे, करवंद असा रानमेवा, ऊस, रेवडी अशी खास थाळीच बच्चेकंपनीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. यामुळे मुलांना या नेहमी न दिसणाऱ्या फळांचा, पारंपरिक पदार्थांचा परिचय करून देता आला हे पालकांनीही आवर्जून सांगितले.
पौष्टिक, सुग्रास आणि सकस खाऊ घालण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या स्वादआर्टच्या प्रवासातील तीन बिंदू अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोकणातील स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देणे, केटरिंग सेवेच्या माध्यमातून रुचकर, पौष्टिक आणि दर्जात्मक खाद्यपदार्थ पुरवणे आणि शेतकरी तसेच बागायतदारांचा पारंपरिक सेंद्रीय पद्धतीने पिकवलेला माल थेट ग्राहकांपर्यंत आणणे. या तीनही आयामांमध्ये स्वादआर्टचा प्रवास सुरू आहे. यासह आणखी एका आयामाचा अंतर्भाव स्वादआर्टमध्ये करण्याचा त्यांचा मानस आहे. तो म्हणजे कपडे, आभूषणे, दैनंदिन वापराच्या वस्तू, शोभिवंत वस्तू स्थानिक कलाकारांच्या वेगवेगळ्या कल्पक कलाकृतींना ग्राहकांपर्यंत पोहोचवणे. खाणे आणि कला या दोन्ही बाबी स्वादआर्ट या नावातच सामावलेल्या आहेत. ‘खाणं ही सुद्धा कला आहे’ हे स्वादआर्टच्या लोगोवरील वाक्यच सारे काही सांगून जाते. त्यांच्या खाद्यसेवेतील कल्पकतेतच त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाचे गुपित दडलेले आहे.