भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची’ही’ मागणी अजित पवार यांच्याकडून मान्य
आमदार निधीतून रुग्णालयांचे स्वतःचे ऑक्सिजन केंद्र उभारणार
मुंबई,दि.१६:राज्यातील कोरोनाचे वाढते संकट ध्यानात घेता आमदार निधीतील प्रत्येकी एक कोटी रुपये सार्वजनिक रुग्यालयांना मदत म्हणून मंजूर करावेत व प्राधान्याने प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती केंद्र उभारावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली व ती उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केली.
पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी मागणी केली की, राज्य सरकारने आमदारांना विकासनिधी वाढवून दिला आहे. त्यापैकी काही निधी थेट कोरोनाच्या प्रतिबंधासाठी वापरणे व त्या माध्यमातून सार्वजनिक रुग्णालयांना मदत करण्याची गरज आहे.
आमदार निधीतील दोन कोटी रुपये कोरोना प्रतिबंधासाठी उपलब्ध करावेत, अशी मागणी प्रदेशाध्यक्षांनी केली. त्यापैकी एक कोटी रुपये निधीला अजित पवार यांनी तातडीने मान्यता दिली व ऊर्वरित एक कोटी रुपयांबाबत आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
अजित पवार यांच्याशी चर्चा करताना चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी ऑक्सिजन पुरवठा कमी पडत असल्याने सर्वत्र समस्या निर्माण झाली आहे. हे ध्यानात घेता सर्व मोठ्या रुग्णालयांचे स्वतःचे ऑक्सिजन निर्मिती केंद्र असणे व त्यांनी ऑक्सिजन पुरवठ्यबाबत स्वयंपूर्ण असणे गरजेचे आहे. आमदार निधीचा वापर या कामासाठी करण्यात यावा.
चंद्रकांतदादा पाटील यांनी रेमडिसिवर इंजेक्शनच्या तुटवड्याचा मुद्दा उपस्थित केला. या इंजेक्शनची खरेदी तसेच रुग्णांना ती देणे ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे होण्याची गरज आहे. रुग्णांना उपचार मिळण्याबरोबरच विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठीही सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.