बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उपनगरीय व इतर रुग्णालये व प्रसुतीगृहांमध्ये नवजात अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) उभारा!
आमदार सुनिल प्रभु यांची पत्राद्वारे तसेच पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे मागणी!

मुंबई (प्रतिनिधी) : नवजात शिशूची आयुष्यातील पहिल्या २८ दिवसात विशेष काळजी घ्यावी लागते. विशेतः अकाली जन्मलेले अथवा अत्यंत कमी वजन अथवा इतर आजारांमुळे नवजात शिशूला नवजात अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) मध्ये दाखल करावे लागते.
मुंबई शहरामध्ये शासकीय अथवा मुंबई महानगरपालिके मार्फत चालविल्या जाणा-या रुग्णालयांमध्ये अत्यंत अपुऱ्या सुविधा उपलब्ध असतात. उपनगराबाबत सांगावयाचे झाले तर नवजात अर्भकाला अतिदक्षता विभागात दाखल करण्याची आवश्यकता भासल्यास वाडिया रुग्णालया शिवाय दुसरा पर्याय नाही परंतू वाडिया रुग्णालयात देखील प्रतिक्षा यादी असल्याने हतबल पालकांना वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. काही वेळेला उशिरा उपचार मिळाल्याने अथवा उपचार न मिळाल्याने नवजात बालके दगावतात. तसेच नवजात अर्भकाला नवजात अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) मध्ये दाखल केले तरी प्रसवमाता एका रुग्णालयात दाखल तर बाळ दुसऱ्या रुग्णालयात असल्याने कुटूंबाची फरफट होते. तसेच खासगी रुग्णालयात आकाराण्यात येणारे भरमसाट दरांमुळे सर्व सामान्य नागरीकांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नाही.
बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत चार प्रमुख रुग्णालये व महाविद्यालये व सोळा उपनगरीय रुग्णालये तसेच २९ प्रसुतीगृहे तसेच महाराष्ट्र शासना अंतर्गत १ वैद्यकीय रुग्णालय व ३ सर्व सामान्य रुग्णालये आहेत या सर्व ठिकाणी उपलब्धतेनूसार जास्तीत जास्त नवजात अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) उभारल्यास याचा फायदा स्थानिक मुंबई करांना होऊन महापालिकेची आरोग्य व्यवस्था अजून सक्षम व सबळ होईल. अशी मागणी आमदार सुनिल प्रभु यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचेकडे केली आहे. तसेच आमदार सुनिल प्रभु यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन या संसदीय आयुधाद्वारे विधानसभा सभागृहात मुद्दा उपस्थित केला.