२४ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होणार,शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई:- राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने घेतला होता. मात्र, या निर्णयाला विरोध झाल्यानंतर आज अखेर सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
याचसोबत शाळा सुरू केल्यानंतर या निर्णयाचे सगळे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असतील असं देखील वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. पालकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
आज सकाळीच शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावावर विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार २४ जानेवारीपासून राज्यात शाळा सुरू होणार आहेत. दरम्यान जिथे रुग्ण संख्या कमी आहे तिथेच शाळा सुरू होणार आहेत.
‘मुलांचे आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे तेथील स्थानिक स्थितीवर लक्ष ठेवत वारंवार त्याचा आढावा घेतला जाईल’, असं वर्षा गायकवाड यांनी यावेळी म्हटले आहे.