ब्रेकिंग

पुरेशा लस साठ्याअभावी ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे लसीकरण उद्या दिनांक ३ मे रोजी बंद..

मात्र १८ ते ४४ वर्ष वयोगटाचे लसीकरण पाच केंद्रांवर राहणार सुरू

मुंबई,दि.२:कोविड-१९ लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवर उद्या सोमवार दिनांक ३ मे २०२१ रोजी ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे लसीकरण होणार नाही. तर १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सध्याच्या पद्धतीप्रमाणे निर्देशित ५ केंद्रांवर सुरू राहील. ज्यांची कोविन अँपमध्ये नोंदणी झालेली आहे आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ(slot) दिलेला आहे, त्यांनाच लसीकरण केंद्रावर लस मिळणार असल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.

सध्या सर्व वयोगटातील नागरिक लसीकरण केंद्रावर मोठ्या स्वरूपात गर्दी करत आहेत, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर आणि लसीकरण केंद्रावर येऊ नये.पालिका प्रशासनाकडून लस उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून लसीचा साठा प्राप्त होताच नागरिकांना कळविण्यात येणार आहे .यास्तव नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊन गर्दी करू नये असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे

कोविड-१९ लसीकरण मोहिमेसाठी मुंबईत, बृहन्मुंबई महानगरपालिका, शासन यांच्यातर्फे ६३ केंद्रे तसेच खासगी रुग्णालयात ७३ अशी एकूण १३६ कोविड-१९ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत कोविड प्रतिबंध लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्या कारणामुळे महानगरपालिका, शासकीय आणि खासगी कोविड लसीकरण केंद्रात उद्या सोमवार, दिनांक ३ मे २०२१ रोजी ४५ वर्षे आणि त्यावरील वयाच्या नागरिकांचे लसीकरण होवू शकणार नाही.

दरम्यान, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ५ लसीकरण केंद्रावर प्रत्येकी ५०० नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे,ते उद्या सोमवार, दिनांक ३ मे २०२१ रोजी देखील सकाळी ९ ते ५ या नियमित वेळेत सुरू राहील. हे लसीकरण केवळ ‘कोविन ॲप’ मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे.

५ लसीकरण केंद्राची नावे पुढीलप्रमाणे:

१. बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).

२. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)

३. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).

४. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).

५. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.

लशींच्या मात्रांचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप त्या-त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल आणि नागरिकांना अवगत करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!