शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे महा..राष्ट्राचा पुरुषार्थ! बाळासाहेब म्हणजे स्वाभिमानाचं दुसरं नाव! बाळासाहेब म्हणजे मराठी माणसाचा बुलंद आवाज.शिवसेनाप्रमुख आज जरी आमच्यात नसले,तरी त्यांचे परखड व जहाल विचार आमच्या रक्तात भिनले आहेत अन् तेच आम्हा शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी आहेत.त्यामुळे त्यांचे स्थान आमच्या हृदयात ध्रुवतारासारखे अढळ आहे.बाळासाहेबांनी शिवसैनिकांची जात,धर्म,पंत,भाषा न पहाता,त्यांच्या कर्तबगारी व निष्ठेवर त्यांना पक्षात नगरसेवक,जिल्हा प्रमुख, महापौर,आमदार,मंत्री,मुख्यमंत्री होण्याची संधी दिली.वास्तवात हीच खरी त्यांची मानवतावादी विचारधारा होती.
वास्तविक पहाता,तब्बल अर्ध शतक मराठी जनमानसावर अधिराज्य करणारी बाळासाहेबांची शिवसेना ही देशात केवळ एकमेव संघटना आहे.बाळासाहेबांसारखे लोकनायक हे सदैव आपल्या विचाराने जिवंत असतात अन् ते समाजालाही जिवंत ठेवतात.वास्तवात बाळासाहेबांनी शिवसैनिकांवर विश्वास ठेवला,तर शिवसैनिकांनी बाळासाहेबांना विश्वास दिला.म्हणूनच आम्ही म्हणतो,एकच साहेब.. बाळासाहेब! खरं तर, शिवसैनिक हे बाळासाहेबांची कवचकुंडलेच.मराठी माणसावर भगवा विश्वास असणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन अन् त्रिवार मानाचा मुजरा!
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी प्रबोधनकार ठाकरे यांच्या सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या ठाकरे घराण्यात झाला,अन् जणू काही हिंदुत्वाचा आधारवड उदयास आला.वंदनीय प्रबोधनकार ठाकरे यांच्या समाज प्रबोधनाच्या विचारांची कास धरून बाळासाहेबांनी अंधश्रद्धा व जातीभेदाला प्रखर विरोध केला.महाराष्ट्रातील मागास जाती-जमातीतील युवकांना शिवसेनेकडे आकृष्ट करून बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्वगुणांना वाव दिला.बाळासाहेबांनी शिवसैनिकांची योग्यता व निष्ठा परखून त्यांना नगरसेवक,महापौर,संघटनेतील महत्वाची पदे,मंत्री,मुख्यमंत्री आदी महत्वपूर्ण पदे बहाल केलीत.वास्तवात बाळासाहेब हे पुरोगामी व मानवतावादी विचारसरणीचे लोकनेते होते,याची यावरून प्रचिती येते.
मंत्रालयात सत्ता असो वा नसो,बाळासाहेबांचा शब्द तेथे प्रमाणित मानला जात असे.संयुक्त महाराष्ट्र लढा असो वा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न असो, त्यांनी सदैव मराठी भूमीपुत्रांचा बुलंद आवाज बनून,शिवसेनेच्या माध्यमातून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी प्रखर लढा दिला.आजही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत शिवसैनिक अन् त्यांच्या लोकप्रतिनिधींनी हा लढा अविरत चालू ठेवला आहे.वास्तवात हीच खरी बाळासाहेबांना मानवंदना होय.
मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मोरारजी देसाई यांचा महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा कुटील डाव बाळासाहेब अन् मराठीप्रेमी सहकाऱ्यांनी हाणून पाडला.अशाप्रकारे त्यांनी महाराष्ट्र-मुंबईची नाळ अटूट ठेवली.कृतज्ञतेच्या भावनेतून बाळासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात धारातिर्थी पडलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मारक मुंबईच्या फ्लोरा फाऊंटन येथे उभारून त्यांचे स्मरण व योगदान मराठी जनमानसाच्या स्मरणात कायम ठेवले.आम्ही मराठी भूमीपुत्र या शूरवीर हुतात्म्यांना त्रिवार वंदन करतो.
राजकारण,संगीत, कला,नाट्य,चित्रपट,लेखक,संपादक,वक्ता अन् व्यंगचित्रकार असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून बाळासाहेबांची जनमानसात ख्याती होती अन् आजही आहे.कारण शिवरायांच्या महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात त्यांना मानाचं स्थान आहे.पण या मागे एक तेजस्वी प्रेरणा होती,ती म्हणजे स्व.मिनाताई ठाकरे.आयुष्यभर त्या त्यांच्या पाठीशी सावलीसारख्या उभ्या राहिल्या.तसेच त्यांच्या सुखदुःखात बरोबरीच्या वाटेकरी राहिल्या.इतकेच नव्हे तर,आपल्या मुलांवर जेवढं प्रेम केलं,तेवढंच त्यांनी शिवसैनिकांवर देखील केलं.मुलांमध्ये अन् शिवसैनिकांमध्ये त्यांनी कधीच दूजाभाव केला नाही.त्या खऱ्या अर्थाने शिवसैनिकांच्या माता होत्या.म्हणून सर्वच जण आजही त्यांना मांसाहेब मिनाताई असे संबोधित असतात.आम्हा शिवसैनिकांचा त्यांना त्रिवार मानाचा मुजरा.
पत्रकारिता हे एक व्रत आहे,अशी त्यांची धारणा होती.उल्लेखनीय गोष्ट म्हणजे दरवर्षी त्यांचे विजयादशमीला होणारे शिवाजी पार्क येथील जहालवादी भाषण ऐकण्यासाठी लाखो शिवभक्त न चुकता तेथे येत असतं.कारण ते ऐकल्याशिवाय चाहत्यांना विजयादशमी साजरी केल्यासारखं वाटायचं नाही.हाच त्यांचा खरा भगवा करिश्मा होता.
पत्रकारांना उद्देशून बाळासाहेब म्हणतात,”आपले नाव व्हावे,या हेतूने कृपया कोणी पत्रकारिता करू नये. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपापली लेखणी सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी चालवा”.व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारिता क्षेत्रात त्यांचे स्थान तर अनन्यसाधारण होते.बाळासाहेब हे उच्च कोटीचे मार्मिक व्यंगचित्रकार होते. फटकारे हे व्यंगचित्रांचे पुस्तक पाहून तर माणसं अक्षरशः थक्कच व्हायची.सर्वसामान्य लोकांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून,सरकारला ते प्रश्न सोडविण्यास भाग पाडण्यासाठी सामना या मुखपत्रात त्यांची लेखणी चालली.मागील कालखंडात तलवारीसारखी चालली.तात्पर्य,
बाळासाहेब ठाकरे हे पत्रकारितेचे जणू चालते बोलते विद्यापीठच होते.
मराठी माणसाच्या अस्मितेचे जतन,संवर्धन व रक्षण करण्याच्या उद्देशाने बाळासाहेबांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेना या मराठमोळ्या संघटनेची स्थापना केली.तेव्हापासून मराठी माणसाला न्याय मिळत आला आहे,याचा आम्हाला मनस्वी आनंद होतो अन् अभिमानही वाटतो.यास्तव हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार मानाचा मुजरा!
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मा.शिवसेनाप्रमुखांच्या महानतेविषयी म्हणतात,”वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचे होते,त्यांनी लहान-मोठ्या सर्वच कार्यकर्त्यांवर अपार प्रेम केलं.महाराष्ट्रातील तमाम मराठीजनांना अन् देशातील हिंदूंना ताठ मानेनं जगण्याची शिकवण दिली.आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला देखील त्यांनी जबाबदाऱ्या देऊन घडविलं.राजकारणातून समाजकारण करण्याचा धडा दिला.महत्वाचे म्हणजे बाळासाहेबांच्या आशिर्वादानेच आम्ही घडलो”.
बाळासाहेबांनी राज्यातील दुर्लक्षित जाती-जमातीतील युवकांना शिवसेनेकडे आकृष्ट करून त्यांना घडविले.अन् त्यांच्यात योग्यता निर्माण करून त्यांना महत्वाची पदे बहाल केली.पुढे याच शिवसैनिकांनी निष्ठापूर्वक व हिमतीने मुंबईत ज्या ज्या वेळी अतिवृष्टी,बॉम्बस्फोटसारखी संकटे आलीत,त्या त्या वेळी सामाजिक जाण ठेऊन मदतीचा हात देत लोकांना संकटमुक्त केलं.त्यांना मायेचा आधार देत सुखद दिलासा दिला. शिवसैनिक आधी करून दाखवितो,नंतर बोलतो हा बाळासाहेबांचा विचार प्रत्येक शिवसैनिकाने अंगिकारून त्याअनुषंगाने आजही ते वाटचाल करत आहेत.त्यामुळेच शिवसेना गेल्या पाच दशकांहून अधिक काळ ताट मानेनं उभी आहे.कारण मोडेल पण वाकणार नाही हा तिचा बाणा आहे.
बाळासाहेबांचे पत्रकारांशी नेहमी स्नेहाचे व खेळीमेळीचे संबंध राहिले.बाळासाहेबांनी एक पाऊल पुढे जाऊन ज्येष्ठ पत्रकार विद्याधर गोखले,भारतकुमार राऊत,नारायण आठवले जे शिवसेनेवर टिकेची झोड करायचे,अशांना देखील
खिलाडीवृत्तीनं शिवसेनेतर्फे थेट खासदार बनवून लोकसभेत पाठविले. बाळासाहेबांचे हृदय हे हिमालयासारखे विशाल होते,ज्यात सर्वजण सामावून जायचे.महत्वाचे म्हणजे बाळासाहेबांना कोणाबद्दलही राग-लोभ-मत्सर नसायचा,मग तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असो वा वृत्तपत्राचा प्रतिनिधी.सर्वच जण त्यांना आपलेसे मानायचे,तर सर्वांना बाळासाहेब देखील
हवे-हवेसे वाटायचे.म्हणून सर्वांच्या मुखात एकच वाक्य,एकच साहेब…बाळासाहेब!
एका निष्ठावान शिवसैनिकाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा,ही इच्छा वंदनीय बाळासाहेबांनी प्रकट केली होती.त्याअनुषंगाने सकल शिवसैनिकांनी अन् त्यांच्या लोकप्रतिनिधींनी एकसंघ होत बाळासाहेबांची इच्छा अखेर पूर्ण करत एकनाथजी शिंदे या एका निष्ठावान शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं.आज जरी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री असले तरी,ते शेतकरी,शेतमजूर,कामगार,विद्यार्थी,सुशिक्षित बेरोजगार,दिव्यांग तथा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे शिक्षण,रोजगार -स्वयंरोजगार,घरकुल व आरोग्य हे मूलभूत प्रश्न प्राधान्याने मार्गी लावतील,ही धवल पाषाणावरील भगवी रेष आहे.कारण
शिंदेसाहेब हे कोणत्या पदावर आहेत,याचा त्यांना काही फरक पडत नाही,कारण त्यांचं नाव व कार्यकर्तृत्व हेच राज्याच्या हितासाठी पुरेसं आहे.
रुग्णदुत एकनाथजी शिंदे यांनी कोरोना
महामारीदरम्यान गोरगरीब,निराधार लोकांचे प्राण वाचविण्यासाठी स्वताच्या जीवाची बाजी लावली.सामाजिक बांधिलकीतून आरोग्य यंत्रणा राबवत हजारों कोरोनाग्रस्त लोकांचे प्राण वाचविले.मित्रहो,यापेक्षा मोठं पुण्यकर्मच नाही.वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणातून समाजकारण करण्याच्या तत्त्वाचा स्वीकार करून शिंदेसाहेबांनी राज्यकारभार हाकला अन् समाजातील शेवटच्या माणसाला न्याय दिला.वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या भगव्या हिंदुत्वाचं रक्षण केलं.वास्तवात हीच खरी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली ठरते.
जीव लावून वेड्यापरी सोडून गेलात जना…!
काहो,बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा,वाट पहाते सेना…!