अनाथांची माय हरपली! पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे:– महाराष्ट्रातील गोर-गरीब अनाथ मुलांची माय, जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे.त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. सिंधुताईंच्या जाण्यानं महाराष्ट्रावर फार मोठी शोककळा पसरली आहे.
१४ नोव्हेंबर १९४७ साली त्यांचा वर्धा जिल्ह्यात जन्म झाला.गरीब कुटुंबात जन्मलेल्या सिंधूताईंचं लहान वयात लग्न झालं आणि त्यानंतर ऐन तारुण्यात पतीने त्यांच्यावर घेतलेल्या संशयामुळे त्यांच्यावर घरं सोडायची वेळ आली.त्यानंतर एकट्या राहणाऱ्या सिंधुताई एकट्या राहणाऱ्या अनाथांच्या सहारा बनल्या.
त्यानंतर त्यांनी अनाथ मुलांना,बेघरांना आसरा दिला आणि मिळेल ते खाऊ घालून त्या त्यांचा उदरनिर्वाह करू लागल्या.त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रभरात भ्रमंती करून वर्गणी जमा केली आणि ठिकठिकाणी अनाथआश्रम सुरू केले आणि याच अनाथआश्रमातून त्यांनी महाराष्ट्रातील अनाथांना आधार दिला.यातूनच त्या आनाथांच्या माय बनल्या.
सिंधुताईंनी केलेल्या अनाथांच्या समाजसेवेबद्दल त्यांना आजवर ७५० हुन अधिक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.तसंच भारत सरकारने त्यांना देशाच्या सर्वोच्च ‘पद्मश्री’ या पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे.दरम्यान आज त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.