रिफायनरी प्रकल्पाविरोधात नव्याने रणनीती ठरणार, मुंबईत बैठक

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे बारसू- सोलगांव पंचक्रोशीतील प्रदूषणकारी रिफायनरीचे संकट अजून पूर्णपणे टळलेले नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भविष्यात कधीही रिफायनरीचा प्रस्ताव आला तर त्याला संविधानिक मार्गाने विरोध करण्यासाठी सर्वांनी सतर्क राहूया, असा निर्धार बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटनेच्या मुंबई येथील बैठकीत करण्यात आला. बारसू – सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटनेची महत्वाची बैठक नुकतीच मार्गदर्शक सत्यचित चव्हाण यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून व मुख्यमंत्र्यांच्या बारसू रिफायनरीविषयी विधानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे पार पडली.
बैठक विधानसभा निवडणुकानंतर पंचक्रोशीत उदभवलेल्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. तर नुकतेच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे पंचक्रोशीवरील प्रदूषणकारी रिफायनरीचे संकट अजून पूर्णपणे टळलेले नाही, हे स्पष्ट झाले आहे. रिफायनरीचा प्रस्ताव भविष्यात कधीही आला तर त्याला संविधानिक मार्गाने विरोध करण्यासाठी सर्वांनी सतर्क असावे, यावर सर्वांचे एकमत झाले.






