मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या अत्याधुनिक सीबीएससी पब्लिक स्कुलचे लोकार्पण

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएससी- आयसीएसई शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागून त्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे,हे बघितलेले स्वप्न आज प्रत्यक्षात उतरल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

प्रभाग क्रमांक१४७ मधील स्थानिक नगरसेविका श्रीमती अंजली नाईक यांच्या प्रयत्नाने चार मजली नवीन इमारतीमध्ये ४०० विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अजीजबाग सीबीएससी मुंबई पब्लिक स्कूलचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री  आदित्य ठाकरे यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री श्री.नवाब मलिक, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार राहुल शेवाळे यांच्या  प्रमुख उपस्थितीत आज  ०२ जुलै २०२१ रोजी अजिजबाग, वाशी नाका, महापालिका सीबीएसी शाळा येथे पार पडले,त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 या प्रसंगी शिक्षण समिती अध्यक्षा श्रीमती संध्या दोशी,  शिक्षण.समिती सदस्य साईनाथ दुर्गे, सह आयुक्त ( शिक्षण ) आशुतोष सलील, शिक्षणाधिकारी  महेश पालकर, उप शिक्षणाधिकारी श्रीमती संगीता तेरे उपस्थित होत्या.

 पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, अजीजबाग येथील ४०० विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे आलेले ०२ हजार अर्ज हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दर्जेदार शिक्षणाचे घोतक असून यापुढील काळात सुद्धा दर्जेदार शिक्षणासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

भविष्यकाळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आयबीच्या शाळा सुद्धा सुरू करण्यात येणार असून या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच प्रत्येक विभागामध्ये एक स्वतंत्र सीबीएसी, आयसीएसई बोर्डाची शाळा सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच २४ वस्तूचे विनामूल्य वाटप असो किंवा खेळांमध्ये फिफासोबत केलेला करार असो, यासर्व बाबी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्य काळामध्ये शासकीय नोकरीमध्ये दिसणारे अधिकारी, कर्मचारी हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकलेले महानुभाव असतील असा मला ठाम विश्वास असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेने मातृभाषेसोबतच सीबीएससी, आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हा चांगला आहे.या परिसरात मोडकळीस आलेल्या काही शाळांच्या इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करून या प्रकारच्या शाळा त्याठिकाणी सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी  महापालिका प्रशासनाला दिले. महापालिका शाळेचा मी विद्यार्थी असून नागरिकांमध्ये महापालिका शाळांविषयी विश्वास निर्माण करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

 खासदार राहुल शेवाळे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की,  महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून माझ्या मतदारसंघात सीबीएससी मुंबई पब्लिक स्कूल सुरू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत असून यासाठी प्रयत्नरत असलेल्या स्थानिक नगरसेविका श्रीमती अंजली नाईक यांचे सुद्धा अभिनंदन करीत असल्याचे ते म्हणाले. देशामध्ये व्हर्च्युअल शिक्षणाच्या माध्यमातून सर्वात जास्त विद्यार्थी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षण घेत असून बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य व शिक्षणाबाबत दर्जेदार सेवा सुविधा मुंबईकरांना देत असल्याचे त्यांनी सांगितले.

 स्थानिक नगरसेविका श्रीमती अंजली नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकातून सीबीएससी शाळेच्या निर्मितीची पार्श्वभूमी सांगितली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच माझ्या महापालिकेच्या गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळावे या  त्यांच्या ध्येयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सीबीएससी, आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने तत्कालीन माझ्या शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत घेण्यात आला.

असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी नर्सरी पासून ते सहावी पर्यंत एकूण ४०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून टप्प्याटप्प्याने ही प्रवेश संख्या वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते फीत कापून तसेच कोनशिलेचे अनावरण करून या शाळेचे लोकार्पण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!