आम्ही सांगितले तर महाराष्ट्रातील 9 कोटी लोक तुमचे चॅनल बघणार नाही – मनोज जरांगे पाटील यांचा वृत्तवाहिन्यांना इशारा

मुंबई: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आज काही मराठी वृत्तवाहिन्यांबद्दल रोष व्यक्त केला. मराठी वृत्तवाहिन्यांनी सरकारचे ऐकून रिपोर्टिंग करु नये. महाराष्ट्रातील गरीब मराठे आंदोलनसाठी मुंबईत आले आहेत. त्यांना समजून घ्या. आंदोलकांबद्दल उलट- सुलट बोलू नका. तुम्ही सरकारचे ऐकून स्वतःचा देव्हारा करुन घेऊ नका, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. तुम्ही आमच्या बातम्या नाही दाखवल्या तरी चालतील आम्ही आमचा सोशल मीडिया सुरु करु, असेही ते म्हणाले.
आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलकांकडून वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधिंसोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गेल्या तीन-चार दिवसांपासून दक्षिण मुंबईत आंदोलकांकडून रस्ते आडवले जात आहेत. रस्त्यावर हुल्लडबाजी सुरु आहे, असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले याबद्दल मनोज जरांगे यांनी रोष व्यक्त केला.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे म्हणाले की, आंदोलकांबद्दल काहीही शब्दप्रयोग केला तर आम्हालाही विचार करावा लागेल. आमचा नाईलाज होईल. राज्यातील आम्ही 7 कोटी लोक तुमचे चॅनल बघतो. तुम्ही सरकारचे ऐकून आमच्याबद्दल काही खोटेनाटे आरोप पसरवत असाल तर आम्हालाही काही चॅनलबद्दल विचार करावा लागेल. असा इशारा त्यांनी दिला. तसेच ते म्हणाले की, ” आम्ही विचार केला तर आम्ही मराठे आणि आमचे ऐकणारे काही बांधव असे 8-9 कोटी लोकांनी ठरवलं तर काही चॅनलबद्दल निर्णय घेऊ शकतो. चार-दोन दिवसांपासून आम्ही पाहात आहोत की काही चॅनल रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही येडे नाहीत, तुम्हाला जर सरकारचे ऐकायचे असेल तर आम्ही 9 ते 10 कोटी आहोत. सरकारच्या मित्राच्या नादात तुमचा देव्हारा होऊ शकतो. कारण आपण एकदा बोलल्यानंतर आपण काही करु शकतो. गेल्या तीन दिवसांत मीही काही चॅनलबद्दल ऐकले आहे. आता काही चॅनलबद्दल आम्हाला संशय यायला लागला आहे. तुम्ही काहीही बोलणार आणि आम्ही ऐकून घेणार असे आम्ही नाही, हे समजून घ्या.”
मनोज जरांगे यांनी काही चॅनल मराठा समाज बॅन करेल असा इशारा दिला. ते म्हणाले, “आम्ही सांगितले तर महाराष्ट्रातील 9 कोटी लोक तुमचे चॅनल बघणार नाही. तुम्ही सरकारचे ऐकून स्वतःचा देव्हारा करुन घेऊ नका,” असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
“आम्हाला बसायला जागा नाही, झोपायला जागा नाही, आमच्या मागील लाईट बंद करण्यात आले. आमच्या जेवणाच्या गाड्या अडवण्यात आल्या, ते तुम्ही दाखवले का? असा सवाल जरांगे यांनी मराठी वृत्तवाहिन्यांना केला. तुम्ही आमचे आंदोलन दाखवले किंवा नाही दाखवले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही आमच्या सोशल मीडियाचा वापर करु,” असेही मनोज जरांगे म्हणाले.
सरकारचे ऐकून जर तुम्ही आमच्यावर आरोप करणार असाल तर मी एखाद्या चॅनलचे नाव सांगितले तर ९ लाख लोक तुमचं एकही चॅनल बघणार नाही, असा धमकी वजा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.