ब्रेकिंग: मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा

नाशिक प्रतिनिधी: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक प्रकरणात माणिकराव कोकाटेंवर आरोप करण्यात आला होता. आता या प्रकरणात न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असून आमदारकी देखील धोक्यात आली आहे.
न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. नाशिक जिल्हा कनिष्ठ न्यायालयात त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर सुनावणी सुरू असून, थोड्याच वेळात जामिनाबाबत निर्णय होणार आहे. माणिकराव कोकाटे यांना जामिन मिळणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता माणिकराव कोकाटे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले कोकाटे?
रितसर निकाल लागलेला आहे, ट्रायल झाल्यानंतर निकाल लागतो. मला न्याय मागण्याचा अधिकार त्यामुळे मी आता वरच्या कोर्टात आपील करणार आहे. हा खटला 1995 चा आहे, पण न्याय प्रणालीनुसार त्याचा निकाल आज लागला. त्यामुळे त्याला जरी उशिर झाला असला तरी आज निकाल लागला आहे. आता मी वरच्या कोर्टात आपील करणार आहेत. ही न्यायालयीन बाब असल्यामुळे मी या संदर्भात जास्त भाष्य करणार नाही. आता माझ्या राजीनाम्याची देखील मागणी होऊ शकते अशी प्रतिक्रिया यावर माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
1995 चं हे प्रकरण आहे. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक प्रकरणात माणिकराव कोकाटेंवर आरोप करण्यात आले होते. त्या प्रकरणात आता माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना दोन वर्षांची शिक्षा तसेच पन्नास हजारांचा दंड ठोठवण्यात आला आहे. हा माणिकराव कोकाटे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात असून, ते आता या प्रकरणात वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहेत.