कोरोनाने मृत पावलेल्यांच्या २ हजार ११६ वारसांना प्रत्येकी ५० हजारांची मदत – पालकमंत्री अमित देशमुख यांची माहिती

लातूर:- राज्य शासनाकडून कोरोना आजाराने मृत पावलेल्यांच्या वारसांना रुपये ५० हजार इतके अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार एकट्या लातूर जिल्ह्यात ३ हजार ४९५ इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आजपर्यंत २ हजार ११६ इतक्या मयत व्यक्तींच्या वारसांच्या अर्जांना जिल्हा प्रशानाच्यावतीने मंजूरी देवून मदत निधी डी.बी.टी. द्वारे थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात राज्य शासनाकडून वितरीत करण्यात आल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितले आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमत्त जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर शुभेच्छा देतांना ते बोलत होते.या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे, खासदार सुधाकर श्रृगांरे, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, आमदार अभिमन्यु पवार, महापौर विक्रांत गोजमगुंडे,यांसह जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, नागरिक, पत्रकार आदींची उपस्थिती होती.
राज्य सरकार टप्प्या-टप्याने हे अनुदान लाभार्थी वारसांच्या बँकेत जमा करत असून लवकरच उर्वरित वारसांना याचा लाभ मिळणार आहे.अजूनही अर्ज दाखल करण्याचे आवाहन राज्य सरकार मार्फत करण्यात येत असून याचा लाभ घेण्यासाठी संबंधित कागदपत्रांची पूर्तता करावी, अशी विनंती राज्य सरकारमार्फत करण्यात आली आहे.