तरूणाच्या खिशामध्येच झाला मोबाईलचा स्फोट, तरुण गंभीर जखमी

सांगली/आटपाडी :- मोबाईलचा वापर आपण सर्वच जण करतो. मोबाईल हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. पण हाच मोबाईल किती घातक ठरू शकतो याचा प्रत्यय आटपाडीमधील एका तरूणाला आला आहे.खिशामध्ये ठेवलेला फोन अचानक गरम होऊन त्याचा अचानक स्फोट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. खिशामध्ये ठेवलेल्या फोनचा अचानक स्फोट झाल्याने आटपाडीतील प्राण चव्हाण हा तरुण जखमी झाला.
याबाबत रितसर तक्रार त्याने आटपाडी पोलिसात नोंदवली आहे. आटपाडीतील प्राण चव्हाण या तरुणाने जानेवारी, २०२१ मध्येच आपल्या मित्राच्या नावावर एका नामवंत कंपनीचा सुमारेतीस हजार रुपयांचा मोबाईल विकत घेतला होता. गेल्या वर्षभरापासून प्राण चव्हाण हाच मोबाइल वापरत होता.
मात्र,काल खिशात ठेवलेला मोबाईल अचानक गरम होत असल्याची जाणीव त्याला झाली. खिशातून मोबाईल बाहेर काढत असतानाच अचानक मोबाईलचा स्फोट झाला आणि यात प्राण चव्हाण याच्या मांडीला गंभीर जखम झाली.
त्याला सध्या सांगलीमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अचानक झालेल्या स्फोटाने त्याच्या कुटुंबातील सर्वजण भयभीत झाले आहेत.आता या विरोधात मोबाईल कंपनीविरोधात दाद मागणार असल्याचे प्राण चव्हाण यांनी
सांगितले आहे.